औरंगाबाद - सीएमआयएच्या शिष्टमंडळाबरोबर इंडोनेशियन दूतावासाच्या प्रतिनिधींची भारत आणि इंडोनेशियामधील द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी तसेच नवीन उद्योग, नवीन गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी शहरात नुकतीच एक बैठक नुकतीच पार पडली. यावेळी या विषयी दोन्ही पक्षात उद्योगवाढीसाठी सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीसाठी चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड. अ‍ॅग्रीकल्चर (सीएमआयए)तर्फे अध्यक्ष कमलेश धूत, उपाध्यक्ष एस. झेड. जाजू, आशिष गाडेकर, हरप्रीतसिंग निर्‍ह यांची प्रमुख उपस्थिती होती. तर इंडोनेशियन दूतावासच्या शिष्टमंडळामध्ये अ‍ॅगूस पी. सप्टोनो, कॉन्सुल जनरल ऑफ द रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया, यादि सुरिहादि, कॉन्सुल एकोनोमिक्स, विजय व्ही. तावडे, सहाय्यक (अर्थशास्त्र) मुस्तफा अन्सारी यांचा समावेश होता. उद्योग-व्यापार, व्यवसाय-शिक्षण आणि पर्यटन या क्षेत्रातील भारत आणि इंडोनेशियामधील द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी चर्चा करण्यासाठी ही प्राथमिक बैठक होती, असे अ‍ॅगूस पी. सप्टोनो यांनी सांगितले. औरंगाबाद-शेंद्रा-जालना विभागात औद्योगिक व पर्यटन क्षेत्रात उपलब्ध संधी तसेच सोई- सुविधांबाबतही त्यांनी आवश्यक माहिती शिष्टमंडळाला दिली. उपाध्यक्ष शिवप्रसाद जाजू यांनी टूलींग व्यवसायात उपलब्ध संधींची माहिती दिली. बैठकीमध्ये इंडोनेशियन विद्यार्थ्यांना भारत आणि इंडोनेशियन शैक्षणिक संस्थांमध्ये सामंजस्य कराराद्वारे अभियांत्रिकी शिक्षण देण्यासाठी शक्यता जाणून घेण्यासाठी चर्चा झाली.

आशिष गाडेकर यांनी औरंगाबादस्थित शैक्षणिक संस्थेत उपलब्ध असणार्‍या सुविधांबाबत माहिती दिली. तसेच मेडिकल टूरीझमची संकल्पना विषद केली. इंडोनेशियन विद्यार्थ्यांना औरंगाबादेतील उद्योगांमध्ये एन-प्लांट ट्रनिंग तसेच व्यवसाय-शिक्षण देण्यविषयी चर्चा केली. हरप्रीतसिंग निर्‍ह यांनी पर्यटनवाढीला प्रोत्साहन देण्यात यावे, असे मत व्यक्त करून उपाययोजना सुचविल्या असल्याची माहिती सचिव सतिश लोणीकर यांनी दिली.

मुंबई ते इंडोनेशिया विमानसेवेचा प्रस्ताव
सीएमआयए अध्यक्ष धूत यांनी बी-टू-बी वेबिनारद्वारे उद्योग-व्यापार संवाद साधण्याची व भारत-इंडोनेशिया उद्योजक समूहांच्या व्यावसायिक दौर्‍यांची संकल्पना व्यक्त केली. मुंबई ते इंडोनेशिया थेट विमान सेवा सूरू करण्यात यावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. या विमानसेवेमुळे दोन्ही देशांत व्यापार, तसेच शैक्षणिक आदानप्रदानाला वाव मिळेल, असेही ते म्हणाले.