औरंगाबाद : शहरात वाढत्या कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाने कठोर निर्बंध लागू केले आहेत. यातच आता महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्तालय आणि विभागीय आयुक्तालय या सरकारी कार्यालयात विविध कामांसाठी येणार्‍या नागरिकांना अ‍ॅन्टिजेन चाचणी केल्यानंतरच प्रवेश देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक कार्यालयात पथके तैनात केली असून पालिकेत बुधवारी दि.24 येणार्‍या नागरिकांची चाचणी करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.
औरंगाबाद शहरात सर्वत्र कोरोना रूग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. मागील सहा दिवसापासून रुग्णांची संख्या शंभरपेक्षा अधिक आढळत असून मंगळवारी तर एका दिवसात तब्बल 240 बाधित रुग्ण आढळून आल्याने प्रशासकीय यंत्रणा हादरली आहे. जिल्हाधिकारी सुनील चौधरी, पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय, पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने रात्री 11 ते सकाळी 6 वाजेदरम्यान संचारबंदी लागू केली आहे. त्यासोबतच आता पालिका प्रशासनाने कठोर निर्बंध लागू केले आहेत. शहरातील व्यापार्‍यांनी दुकानांमध्ये एकावेळी पाचपेक्षा अधिक व्यक्तींना प्रवेश देऊ नये, दुकानामध्ये थर्मलगन, ऑक्सीमिटरव्दारे ग्राहकांची तपासणी करावी. तसेच विमानतळ, रेल्वेस्टेशन, मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांची आणि जाधववाडी भाजीमंडईत भाजी, फळ विक्रेते, खरेदीसाठी येणार्‍या नागरिकांची तपासणी केली जात आहे. चार कोविड केअर सेंटरमध्ये 24 तास आणि नऊ आरोग्य केंद्रात दिवसभर कोरोना चाचणी सुरू केली आहे. किलेअर्क, एमजीएम कोविड केअर सेंटर सूरू करुन कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले जात आहे. या पार्श्‍वभूमीवरच आता शासकीय कार्यालयांत अ‍ॅन्टिजेन चाचणी केल्यानंतरच अभ्यांगतांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. 

निगेटिव्ह अहवाल आल्यानंतरच प्रवेश : पालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्तालय, विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी अभ्यांगतांची अ‍ॅन्टिजेन चाचणी करण्यासाठी पालिकेने पथके तैनात केली आहे. या कार्यालयात येणार्‍या नागरिकांना अ‍ॅन्टिजेन चाचणी केल्यानंतरच प्रवेश दिला जाणार आहे. बुधवार दि.24 पासून या कार्यालयात अ‍ॅन्टिजेन चाचणी करण्यास सूरूवात देखील झाली आहे. सुटीचे दिवस वगळता सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत नित्याने पालिकेचे पथक या कार्यालयांत प्रवेशद्वारावरच चाचणी करेल. चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच प्रवेश दिला जाईल. पॉझिटिव्ह आढळल्यास संबंधितांना तातडीने पालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जाईल, असे डॉ. नीता पाडळकर यांनी स्पष्ट केले.