औरंगाबाद : फायनान्स कंपनीने कामावरून काढून टाकल्याच्या रागातून कर्मचार्‍याने अट्टल गुन्हेगाराच्या मदतीने फायनान्स कंपनीतील बचत गटाच्या वसुली एजंटला डोळ्यात मिरची पूड टाकून सव्वा लाख रुपये लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना 11 ऑगस्ट रोजी सकाळी साडे सातच्या सुमारास विहामांडवा-तुळजापूर रस्त्यावरील कॅनलजवळ घडली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी लुटणार्‍या टोळीला मंगळवारी (दि.12 ऑक्टोबर) बेड्या ठोकल्या. प्रदिप उर्फ मोना हरिभाऊ चोथे (22, रा. भोलेश्वर नगर, इंदेवाडी ता. जि.जालना), ऋषीकेश कल्याण गोरे (21, रा. माळेगांव ता. बदनापुर) आणि हनुमंत दत्तात्रय खरात (24, रा. मंगरुळ ता. घनसावंगी) अशी लूटमार करणार्‍या अटकेतील गुन्हेगारांची नावे आहेत.
इम्रान लियाकत अली सय्यद (21, रा. खडकी कोळगांव ता. गेवराई जि. बीड, ह.मु. पिटूंबरा गल्ली, पैठण) हे भारत फायनान्स कंपनीच्या पैठण शाखेत वसुली एजंट म्हणून कामाला आहेत. 11 ऑगस्ट रोजी सकाळी साडे सातच्या सुमारास दुचाकीवर त्यांनी इंदेगांव व विहामांडवा येथे चार ठिकाणी जाऊन कर्ज वसुलीचे 1 लाख 24 हजार 784 रुपये जमा जमा करून दुपारी तीनच्या सुमारास पैठणकडे निघाले होते. विहामांडवा ते तुळजापुर रस्त्यावरील कॅनॉलच्या पुढे येताच पाठीमागून दुचाकीवर तिघेजण आले. त्यातील एकाने सय्यद यांच्या धावत्या दुचाकीला लाथ मारली. त्यामुळे ते दुचाकीसह पडले. त्यानंतर दोघांनी पैशाची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सय्यद यांनी विरोध केल्याने एकाने त्यांच्या डोळयात मिरची पावडर टाकली. तसेच डोक्यात बिअरची बाटली मारुन त्यांना जखमी करून पैशांची बॅग ज्यात 1 लाख 36 हजार 882 रोख, दोन टॅब व दोन बायोमेंट्रीक मशीन असा ऐवज लुटून नेला होता. याप्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांना तपास करताना तांत्रिक विश्लेषणाआधारे व गोपनीय माहिती मिळाली की, भारत फायनान्सच्या पैठण शाखेत दिड वर्षापूर्वी कामाला असलेला प्रदिप चोथे यानेच साथीदाराच्या मदतीने लूटमार केली आहे. प्रदीपला पोलिसांनी ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

दिड लाखांचा मुद्देमाल जप्‍त : पोलिसांनी प्रदीप चोथेसह ऋषीकेश गोरे व हनुमंत खरात या अट्टल गुन्हेगारांना अटक केली. त्याच्या ताब्यातून दोन दुचाकी, तीन मोबाईल असा एकूण 1 लाख 54 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तिघांना पैठण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कामगिरी पोलीस अधीक्षक निमित गोयल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, उपनिरीक्षक विजय जाधव, प्रदीप दूबे, जमादार प्रमोद खांडेभराड, किरण गोरे, नामदेव सिरसाठ, संजय भोसले, सुनिल खरात, नरेंद्र खंदारे, वाल्मीक निकम, ज्ञानेश्वर मेटे, योगेश तरमाळे, जिवन घोलप यांनी केली.

कामावरून काढून टाकल्याच्या रागातून अट्टल गुन्हेगाराच्या मदतीने लुटले : प्रदीप चोथे हा दिड वर्षापूर्वी पैठणच्या भारत फायनान्स शाखेत महिला बचत गटाच्या कर्जाचे वसुलीचे काम करीत होता. त्याला काम व्यवस्थित करत नसल्याने कंपनीने कामावरून काढून टाकले होते. दरम्यान, भारत फायनान्सच्या कामकाजाचे स्वरुप प्रदीपला चांगल्या प्रकारे माहिती होते. वसुली एजंट पैसे घेऊन एकाच मार्गाने जात असतात त्यांना निर्जनस्थळी गाठून लुटण्याचा प्लॅन आखला. त्यासाठी त्याने अट्टल गुन्हेगार मित्र ऋषीकेश गोरे आणि हनुमंत खरात यांना सोबत घेऊन सय्यद यांना मारहाण करून लुटले. दोघांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.