औरंगाबाद - पेट्रोल पंपावर काम करणार्‍या एका हातमजूराला पाहिली मुलगी असताना दुसरीही मुलगीच झाली. याने निराश झालेल्या मजुराला जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका सरला कामे यांनी मदतीचा हात दिला आहे. मुलीच्या नावे सुकन्या योजनेत पाच हजारांचे फिक्स डिपॉझिट टाकून देत मुलीच्या भविष्याची सोय केली आहे.

भराडी पेट्रोल पंप येथे काम करित असलेले संदिप चिचपुरे यांना दुसरी मुलगीच झाली म्हणुन ते मनस्वी नाराज होते. दुसर्‍या मुलीचे नाव त्यांनी आराध्या ठेवले. हातावरचा संसार, त्यात दोन मुली झाल्या म्हणुन आर्थिक परिस्थतीचा विचार करत मुलींच्या शिक्षणाचा व भविष्याचा विचारात चिचपुरे दिवसरात्र चिंतेत होते. सिल्लोड तालुक्यातील शिवना जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका सरला कामे-कुमावत व त्यांचे पती अशोक कुमावत पेट्रोल भरण्यासाठी सदरील पंपावर गेले असता चिंतातुर झालेल्या बापाची योगायोगाने त्यांची भेट झाली. बोलताना चिंचपूरे यांच्या चितेंचे कारणही कळले. आपण काहीतरी करायला हवे या हेतूने कामे यांनी याबाबत अधिक माहिती घेतली.

याप्रकरणी कामे यांनी आराध्याच्या भविष्यासाठी सुकन्या योजनेत फिक्स डिपॉझिट टाकण्याचे ठरविले. त्यानुसार आराध्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन तिच्या नावे पोस्टात सुकन्या योजने अंतर्गत खाते काढून पाच हजार रूपये 18 वर्षासाठी फिक्स डिपाजीट करून आराध्याचे भविष्य व लग्नाची चिंता दुर केली. याप्रसंगी पुंडलिकराव चाफे, ऍडव्होकेट संतोष झाल्टे, झाल्टे ताई, ऍडव्होकेट आरके तसेच नागरिकांची उपस्थिती होती.

स्त्रीजन्माचे स्वागतच व्हावे
सर्व पालकांनी मुलींचा कंटाळा केला तर या मुलांना जन्म देणारी कुसच संपून जाईल याचा विचार समाजातील प्रत्येक घटकाने केला पाहीजे. दोन्ही मुलीच झाल्या म्हणून नकारात्मक विचार न करता स्त्री जन्माचे स्वागत करावे. त्या सक्षम करण्यासाठी भविष्याचे नियोजन करून सणसमारंभ छोट्या स्वरूपात करून उरलेला पैसा मुलींच्या भविष्य सुरक्षिततेसाठी वापरावा. मुलींसाठीच्या शासनाच्या विविध योजनांच्या लाभ घेवून त्यांना सुरक्षित भविष्य द्यावे.
-सरला कामे, जि.प. शिक्षिका