औरंगाबाद : औरंगाबाद शहराच्या चारही बाजूंनी नॅशनल हायवेचे जाळे विणण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने औरंगाबाद ते शिर्डी,  नगर नाका ते दौलताबाद टी पॉइंट, औरंगाबाद ते पैठण, औरंगाबाद ते जालना यासह शहरातील जालना रस्त्यावर तीन उड्डाणपूल, रस्त्याचे चौपदरीकारण भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्याकडून करण्यात येईल, अशी ग्वाही भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव अग्रवाल यांनी खासदार डॉ. भागवत कराड यांना दिली आहे.
आशिया खंडात औरंगाबाद हे शहर सर्वाधिक वेगाने विकसित होत आहे. तसेच या शहराशेजारील परिसरात नागरिकांची लोकसंख्या वाढलेली आहे. त्यामुळे शहराबाहेरील प्रमुख मार्गाचे रुंदीकरण आणि चौपदरीकरण होणे आवश्यक आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणकडून प्रमुख मार्ग चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरू करण्यात येईल, असे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे राजीव अग्रवाल अग्रवाल यांनी हॉटेल रामा इंटरनॅशनल येथील आढावा बैठकीत सांगितले, अशी माहिती डॉ. कराड यांनी दिली. यात प्रामुख्याने नगर नाका, मिटमिटा-दौलताबाद, औरंगाबाद-पैठण, एएस क्लब ते शिर्डी या मार्गांसाठी किमान 700 कोटी रुपये अपेक्षित असून या महामार्गाचे काम जलद गतीने होणार आहे. त्यासाठी साईबाबा संस्थान शिर्डी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या पन्नास टक्के भागीदारीतून महामार्गाचे काम जलद गतीने करण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-52 सोलापूर ते धुळे महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. कन्नड येथील औट्रम घाटामध्ये बोगदा प्रस्तावित आहे. मात्र त्यावर किमान पाच हजार कोटी रुपये खर्च येत आहे. त्यामुळे घाटामध्ये सरसकट चौपदरीकरण करण्यात येईल. बोगदा ऐवजी डोंगर कापून सरळ अकरा किलोमीटर चौपदरीकरण केले तर, खर्चही कमी येईल आणि वाहतूकीतही अडथळा येणार नाही. त्यामुळे या महामार्गाचे घाटामध्ये चौपदरीकरण होणार आहे, असे अग्रवाल यांनी सांगितले. यावेळी भाजपचे विवेक देशपांडे, संजय खंबायते, कन्नड जिल्हा परिषद सदस्य किशोर पवार यांसह शेतकरी बांधव उपस्थित होते.

शहरातील रस्त्यांच्या रुंदीकरणाची मागणी : शहरातील जालना रोडवर मुकुंदवाडी, अमरप्रीत हॉटेलसमोर आणि आकाशवाणी चौकात उड्डाणपूल करावेत, अशी मागणी खा. डॉ भागवत कराड यांनी केली आहे. शहराच्या लोकसंख्येत वाढ झाल्याने वाहतूक देखील वाढली, शहराबाहेर जाणारे रस्ते अरुंद आहे. त्यामुळे, मोठ्या प्रमाणात वाहतुकीला अडथळा होत आहे. त्यासाठी प्रमुख रस्त्याचे रुंदीकरण होणे आवश्यक असल्याचे खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी या बैठकीत सांगितले.