बाजार सावंगी : येथील जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे यसगाव क्रमांक 2 ते बाजार सावंगी-इंदापूर-बोडखा गंधेश्वर या सात किलोमीटर रस्त्याचे काम तीन वर्षापासून सुरू झाले असून अद्याप अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे औरंगाबाद-बाजार सावंगी-कन्नड या मुख्य जिल्हा मार्गावरील रहदारीस होणार्‍या अडथळ्यांमुळे या भागाचा विकास खुटला आहे. तसेच गावालगतच्या तीन पुलांची कामे देखील अर्धवट स्थितीत असल्याने रहदारीचा खोळंबा होत आहे.
या रस्त्याच्या कामात वारंवार दुर्लक्ष केल्याने व सतत तीन ते चार वर्षात कामाची अधिक प्रगती न झाल्याने कंत्राटदाराच्या काम ढकलपणामुळे संबंधित विभागाने दिलेले कंत्राट देखील रद्द केल्याचे समजते. गावाअंतर्गत सिमेंट रस्त्यांचे झालेले बांधकाम एकतर्फी तीन ठिकाणी अर्धवट स्थितीत असल्याने वाहतुकीची नेहमीच कोंडी होते. बाजाराच्या दिवशी मोठा अडथळा येतो. गंधेश्वर जवळ काही प्रमाणात काम झालेले असले तरी या रस्त्याच्या कामात डांबरीकरण होण्याइतपत कामच न झाल्याने व रस्ता जागोजागी उखडलेला असल्याने अपघाताची भीतीपोटी या रस्त्यांवरील कन्नड आगाराच्या कन्नड-बोडखा-बाजार सावंगी ते फुलंब्री अशा बस फेर्‍या देखील अनेक महिन्यांपासून बंदच आहे. बाजार सावंगी-इंदापूर-बोडखा या रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाल्याने त्या-त्या भागातील लोकांना अधिकचा फेरा व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. सार्वजनिक बांधकाम विभागाने या भागातील विकासासाठी रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण त्वरित करावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.