औरंगाबाद : मागील सहा महिन्यांपासून मेल्ट्रॉन कोविड रुग्णालयातील लिक्वीड ऑक्सीजन प्लांटचे नुसते कागदी घोडे नाचवले जात होते. दरम्यान, या प्लांटच्या कामाला सुरूवात होणार असतानाच त्याऐवजी आता हवेतून ऑक्सीजन तयार करण्याचा प्लांट उभारण्याचे महापालिकेने ठरवले आहे. विशेष म्हणजे, मेल्ट्रॉन रुग्णालयात असे चार प्लांट उभारले जाणार आहेत. यामुळे मेल्ट्रॉनमधील सर्व तिनशे बेड्सला ऑक्सीजन पुरवणे शक्य होणार आहे.

 कोरोनाच्या या दुसर्या लाटेत गंभीर रुग्णांची संख्या अधिक दिसून येत आहे. त्यामुळे अशा गंभीर रुग्णांना ऑक्सीजनची अधिक गरज भासत आहे. यातच ऑक्सीजनच्या तुटवड्यामुळे रुग्णांची हेळसांड होऊ लागली आहे. मागील काही दिवसांत ऑक्सीजन बेड मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना विविध रुग्णालयांत खेट्या माराव्या जागत आहेत. त्यामुळे पालिकेने मेल्ट्रॉन येथील कोविड रुग्णालयात ऑक्सीजन प्लांट उभारण्याचे ठरवले. त्यासाठी निविदा प्रक्रिया देखील राबवली. या लिक्वीड प्लांटसाठी जिल्हाधिकार्यांनी आपत्ती व्यवस्थापन निधीतूनसाडेचार कोटींचा निधी द्यावा अशी मागणी पालिकेने केली होती. त्यानुसार पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर जिल्हाधिकार्यांनी ही मागणी मान्य केली. जिल्हाधिकार्यांकडून निधी प्राप्त झाल्यावर प्लांटचे काम करणार्या कंत्राटदाराला वर्कऑर्डर देण्यात आली. वर्कऑर्डर मिळाल्यानंतर कंत्राटदाराने बेसमेंटचे काम सुरु केले आणि नंतर अचानक हे काम थांबवण्यात आले. दरम्यानच्या काळात हवेतून ऑक्सीजन निर्मिती करणार्या कंपनीशी पालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांची बातचीत झाली. त्यातून त्यांनी हवेतून ऑक्सीजन निर्मितीचे प्लांट मेल्ट्रॉमध्ये उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील मेल्ट्रॉनसाठी ऑक्सीजनचे दोन प्लांट देण्याची घोषणा केली. हे प्लांट देखील हवेतून ऑक्सीजन निर्माण करणारेच आहेत.

वेळ वाचवण्यासाठी बदलला निर्णय
लिक्वीड ऑक्सीजन प्लांटची खरी गरज आहे. मात्र त्यापेक्षा हवेतून ऑक्सीजन तयार करणारा प्लांट उभारण्यास कमी वेळ लागतो. त्यामुळे मेल्ट्रॉनसाठी हवेतून ऑक्सीजन निर्मिती करणारे चार प्लांट उभारण्याचे आता ठरवले आहे. लवकरच त्याचे काम सुरु होईल, असे पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी माहिती देताना स्पष्ट केले.