औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आजवर मराठा समाजाची फसवणूकच करण्यात आली आहे. त्यातच आता आरक्षण रद्द झाल्यामुळे मराठा समाज अधिकच संतप्त झालेला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या निषेधार्थ 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनी औरंगाबादेत गनिमी काव्याने मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवून जाब विचारणार आहोत. तसेच 7 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिलिवर ओक, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा असे प्रमुख पक्ष प्रमुखांच्या बंगल्यासमोर देखील मोर्चा आंदोलन केले जाईल, असा इशारा मराठा क्रांती ठोक मार्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला. 
मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळास वाढीव निधी, जाचक अटी रद्द करणे, अध्यक्षांची नेमणूक, सारथीला वाढीव निधी, विविध योजनांमध्ये पारदर्शकता आणणे, यासह विविध मागण्यांसाठी युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात आंदोलन छेडले होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व प्रश्न टप्प्याटप्प्याने सोडवण्याची ग्वाही दिली होती. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालेली नाही. केंद्र व राज्य सरकार उदासीन धोरण राबवत आहे. त्यामुळे मराठा समाजाला आजवर न्याय मिळालेला नाही. 
आता यापुढे आरक्षणाविषयी ठोस भूमिका घेत नाही तोवर मंत्री, आमदार, खासदारांना शहर व गावात फिरकू न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 17 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांचा ताफा आडवला जाणारआहे. तसेच प्रमुख पक्ष प्रमुख्यांच्या घरासमोर निदर्शने मोर्चा आंदोलन केले जाणार आहे, असे रमेश केरे यांनी सांगितले. या पत्रपरिषदेला आप्पासाहेब कुढेकर, राहुल पाटील, पंढरीनाथ गोडसे, मनोज मुरदारे, भरत कदम, किरण काळे, किशोर शिरवत, धनंजय चिरेकर, गणेश उगले 
आदी उपस्थित होते.

भाजप प्रदेशाध्यक्षांच्या घरासमोरही आंदोलन : सकल मराठा बांधवांवरील गुन्हे अद्याप मागे घेण्यात आलेले नाहीत. 42 तरुणांनी आत्मबलिदान दिले. त्यांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली गेली नाही. एकाला नोकरीचे दिलेले आश्वासनही फोल ठरले. शासन निर्णय होतात मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही. अशा सर्व निर्णयाची शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रमुख, भाजप प्रदेशाध्यक्षांच्या घरासमोर 7 ऑक्टोबर रोजी जीआरची होळी केली जाणार असल्याचे केरे यांनी स्पष्ट केले.