औरंगाबाद : मनपाच्या भवानीनगरातील औषधी भांडारमधून गायब झालेला 48 रेमडेसिवीर इंजेक्शनचा बॉक्स कोणी चोरला हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी मेल्ट्रॉन हॉस्पिटलमधून आणलेल्या रेमडेसिवीरच्या रिकाम्या बॉक्समध्ये एमपीएस नावाचे दुसरे इंजेक्शन भरणारा मास्टरमाइंड आरोपी विष्णू दगडुजी रगडे असल्याचे जिन्सी पोलिसांच्या तांत्रिक तपासातून समोर आले. परंतु, पोलीस कोठडीत असलेला रगडे तोंड उघडत नसल्याने 48 रेमडेसिवीर नेमके कुठे गेले ? याचा शोध घेताना पोलिसांना अडचणी येत आहेत असे सूत्रांनी सांगितले. 

उपलब्ध साठ्यापैकी एक हजाराहून अधिक रेमडेसिवीर घाटीला देण्यात आले. 19 एप्रिल रोजी औषध भांडारात एक हजार 262 रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा शिल्लक होता. 20 एप्रिल रोजी हा साठा मेल्ट्रॉन हॉस्पिटलला पाठविण्याचे आदेश राठोडकर यांनी दिले होते. त्यानुसार, भांडार प्रमुख विष्णू रगडे आणि सहायक औषध निर्माण अधिकारी प्रणाली कोल्हे यांनी हा साठा मेल्ट्रॉन हॉस्पिटलला पाठविला होता. 23 एप्रिल रोजी मेल्ट्रॉन हॉस्पिटल येथील भांडार प्रमुख संतोष कापुरे व पूजा कुलकर्णी यांनी हे बॉक्स तपासले. तेव्हा त्यात 31 हजार 987 रुपयांचे 48 रेमडेसिवीर इंजेक्शनऐवजी एमपीएसचे 75 इंजेक्शन आढळले. त्यांनी ही बाब राठोडकर यांना कळविली. त्यानुसार 48 रेमडेसिवीर इंजेक्शन लंपास झाल्याची बाब समोर आली.  

9 ते 13 एप्रिलचा घटनाक्रम....
9 एप्रिलला सहायक फार्मासिस्ट (कंत्राटी) प्रणाली कोल्हे हिला 48 रेमडेसिवीरचा एक बॉक्स गायब असल्याचे लक्षात आले. तिने तात्काळ हा प्रकार भांडार प्रमुख विष्णू रगडे आणि भांडार नियंत्रक बाळकृष्ण राठोडकर यांना सांगितला. तेव्हा त्यांनी शोधाशोध करा, रेकॉर्ड तपासा, असे सुचविले. 10 एप्रिलला त्यानंतर कोल्हे हिने सर्वत्र शोध घेतला, रेकॉर्ड तपासले, परंतु बॉक्सचा घोळ काही मिटला नाही. 11 एप्रिलला रविवार असतानाही रगडेने कोल्हेला फोन करून मेल्ट्रॉन हॉस्पिटलला बोलावले. तिला मेल्ट्रॉनचा स्टॉक तपासायचा आहे, असे सांगितले. त्यानंतर मेल्ट्रॉनचे भांडारप्रमुख संतोष कापुरे व पूजा कुलकर्णी यांनाही फोन करून येथे बोलावले. परंतु, कुलकर्णी तेथे आल्या नाहीत. रगडे, कोल्हे आणि कापुरे तेथे गेले. स्टॉक तपासतानाच रगडेने रेमडेसिवीरचा एक भरलेला बॉक्स उचलला. हा प्रकार कापुरे यांच्या लक्षात आला. त्यांनी हात जोडून आमची नोकरी धोक्यात आणू नका, अशी विनंती केली. 

त्यानंतर रगडेने भरलेला बॉक्स खाली ठेवला, पण किमान रिकामा बॉक्स तरी द्या, असे म्हणून तेथून रेमडेसिवीरचा रिकामा बॉक्स घेतला. तो बॉक्स कोल्हेकडे दिला. तिला दुचाकीने घरी घेऊन जाण्यास सांगितले. 12 एप्रिलला सकाळी नऊ वाजताच रगडेने तिला फोन करून तो बॉक्स मागविला. प्रणाली कोल्हेच्या पतीने तो बॉक्स मयूर पार्कमध्ये त्याला आणून दिला. तो बॉक्स घेऊन रगडे भवानीनगरातील भांडारमध्ये पोचला. त्याने स्वत:च्या चावीने भांडार उघडले. रेमडेसिवीरच्या रिकाम्या बॉक्समध्ये एमपीएस इंजेक्शन भरले. तो बॉक्स चांगला पॅक करून ठेवला. ही माहिती त्याने फोनद्वारे कोल्हेला दिली. 13 एप्रिलला मनपाचे वैद्यकीय अधिकारी तथा औषधी भांडार नियंत्रक बाळकृष्ण दत्तात्रय राठोडकर यांनी भवानीनगरातील साठा तपासला. त्यात सर्व काही अलबेल असल्याचे दाखविले होते.