औरंगाबाद : कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. तसेच अत्यावश्यक सेवांच्या दुकानांनाही सकाळी अकरा वाजेपर्यंतच परवानगी आहे. मात्र असे असतानाही शहरात कोरोना नियमांचे उल्लंघन केले जात आहे. काही व्यापारी अकरा वाजेनंतरही दुकाने उघडी ठेवत असल्याने महापालिकेने आता अशांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पालिका आणि कामगार उपायुक्त कार्यालय यांच्या संयुक्त पथकाने शनिवारी दि.8 गुन्हा दाखल झालेल्या 30 दुकानांना सील 
ठोकले. पैठण गेट, गुलमंडी, सिटीचौक, बसस्थानक परिसरात ही कारवाई करण्यात आली.
ब्रेक द चेनअंतर्गत कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंधासंदर्भातील नियमावाली जाहिर केली आहे. या नियमांची अंमलबजावणी होते आहे की नाही, याविषयीची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने नियमावली जाहिर केली असून अत्यावश्यक दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवण्यात आदेश आहेत. तरी देखील शहरात कोरोना नियमांचे उल्लंघन करीत लॉकडाऊन काळातही दुकानांचे शटर अर्धावर ठेवून कपडयांसह इतर साहित्याची विक्री केली जात आहे. 
अशा दुकानदारांवर सिटीचौक आणि क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. गुन्हा दाखल झालेली दुकाने सील करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पालिका आणि कामगार उपायुक्त कार्यालय यांना दिले आहे. 
त्यानुसार शनिवारी पालिका व कामगार उपायुक्त कार्यालयाचे पथक पालिकेचे प्रभाग अधिकारी प्रकाश आठवले यांच्या नेतृत्वाखाली पदनिर्देशक अधिकारी आर. एस. राचतवार, निरीक्षक सलमान काझी, वरिष्ठ लिपीक अलिम शेख, कनिष्ठ लिपीक सय्यद अफझल, स्वच्छता निरीक्षक सचिन मिसाळ, विशाल खरात, मनीष मिसाळ, किशोर नाडे यांच्यासह कामगार उपायुक्त कार्यालयाचे कामगार अधिकारी रोहन रूमाले, अमोल जाधव, दुकान निरीक्षक जी. ए. गावंडे, दुकाने निरीक्षक तथा सुविधाकार विठ्ठल वैद्य यांच्या संयुक्त पथकाने नागरिक मित्र पथकाच्या सहकार्याने सिटीचौक, कुंभारवाडा, रंगारगल्ली, गुलमंडी, बसस्थानक या भागातील 30 दुकाने सील केली. 

पथक येताच दुकानांसमोरील कर्मचारी पसार : पथकाने दुकाने सील करण्याची कारवाई सुरू केल्यानंतर पैठणगेट ते गुलमंडी दरम्यान दुकानांसमोर रस्त्यावर उभे राहून वाहनधारकांसह पादचार्‍यांना विनाकारण खरेदीसाठी दुकानात बोलावण्यार्‍या कर्मचार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे, सिटीचौक ते शहागंज रस्त्यावर दुकानासमोर उभे राहणारे कर्मचारी पसार झाले. त्यामुळे कारवाई होताच दुकानासमोर शुकशुकाट दिसून आला.  

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशापर्यंत दुकाने बंदच : पैठणगेटवरील गुडलक प्लोअर डेकोरेटर्स अ‍ॅड इव्हेन्ट, लक्की प्लेन्टस अ‍ॅड प्लोरीस्ट यांच्यासह सिटीचौक मधील कपडयाचे ऑनेस्टी मॉड वेअर, साबा कलेक्शन, झोरा क्लॉथ, आर. के. कलेक्शन, अभय ड्रेसेस, रतनलाल मोतीलाल, करिष्मा क्लॉथ सेंटर, कृष्णा क्लॉथ, पंजाब शुटिंग शर्टिंग, शरद वॉच, गुलशान क्लॉथ, चांडक कृष्णा, फेमस ए-1 टेड्रर्स, सरल इलेक्ट्रिशन, रुख्मीणी साडी सेंटर, मनोकामना क्लॉथ सेंटर, मध्यवर्ती बसस्थानक समोरील युनुस टी हाऊस यासह 30 दुकानांना सील ठोकले.  यातील काही दुकानांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल केलेला आहे. आता जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशापर्यंत ही दुकाने बंद राहणार आहेत.