औरंगाबाद : महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वाहनांना अंबर दिवा असतो. त्यामुळे या विभागाशी संबंध नसताना देखील तेथील वाहन मिळविण्यासाठी पालिकेतील अधिकार्‍यांचा खटाटोप सुरू आहे. या विभागासाठी खरेदी केलेल्या वाहनांची पालिका अधिकार्‍यांनी पळवापळवी सुरू केली आहे. अग्निशमन विभागातील अशी दोन वाहने पालिका अधिकार्‍यांना दिलेली असल्याने या विभागाच्या कामात खोळंबा निर्माण झाला आहे. त्यामुळे ही वाहने परत मिळावीत, अशी मागणी अग्निशमनने पालिकेच्या यांत्रिकी विभागाकडे केली आहे. विशेष म्हणजे, यातील एक कार आयुक्‍तच चालवत आहेत.

पालिका मुख्यालयाप्रमाणेच मागील काही वर्षांपासून अग्निशमन विभागातील रिक्‍त पदांचीही भरती झालेली नाही. परिणामी, रिक्‍त पदे आणि नव्याने भरती होत नसल्याने या विभागाचे कामकाज सध्या कंत्राटी कर्मचार्‍यांवरच सुरू आहे. विशेष म्हणजे, मुख्य अग्निशमन अधिकारी हे पद देखील तीन वर्षांपासून प्रभारीकडूनच चालविले जात आहे. शहर व परिसरात आगीची घटना घटल्यास अपुर्‍या यंत्रणेवर जिवाची पर्वा न करता जवान आगी आटोक्यात आणत आहेत. हा विभाग सक्षम करण्याची गरज असताना दुसरीकडे या विभागाकडे असलेली वाहने काढून पालिका अधिकार्‍यांना वापरण्यास दिली जात आहेत. या विभागाकडे दोन इनोव्हा गाड्या आहेत. यातील एक कार प्रशासक तथा आयुक्त वापरतात. तर दुसरी इनोव्हा कार एका उपायुक्ताला दिलेली आहे. एक बुलोरो जीप कंत्राटी पद्धतीने पालिकेत घेतलेले विशेष वसुली अधिकारी वापरतात. त्यामुळे सध्या अग्निशमन विभागासाठी चांगल्या अवस्थेत असलेली एकच जीप आहे. या जीपचेही काही काम निघाल्यास अन्य वाहन नसल्याने अधिकार्‍यांची अडचण होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रशासकीय कारभारात अधिकार्‍यांची मनमानी
कोरोना काळात कर्तव्यावर असताना नागरिकांवर वचक बसवण्यासाठी अग्निशमन विभागाचे वाहन पालिका अधिकार्‍यांना देण्यात आले. यापूर्वी देखील खासगी कामासाठी जाताना एका उपायुक्ताने अग्निशमन विभागाच्या वाहनाचा वापर केला होता. या वाहनाला अपघात झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. नगरसेवकांनी त्यावेळी आक्षेप घेतला. मात्र सध्या प्रशासकीय कारभार सुरू असल्याने अधिकार्‍यांची मनमानी सुरू असल्याचे दिसत आहे.