औरंगाबाद : महापालिकेने आता राज्य सरकारच्या निर्देशानुसार कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी कवच कुंडल मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत आता उच्च न्यायालय, पोस्ट कार्यालय, रेडक्रॉस, विमानतळ, रेल्वेस्टेशन या ठिकाणीही लसीकरण सुरू केले जाणार आहेत, अशी माहिती पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसीकरणाला गती मिळावी, या उद्देशाने आरोग्य विभागाच्या वतीने मिशन कवच कुंडल ही मोहीम 8 ते 14 ऑक्टोबरपर्यत राबविण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार औरंगाबाद पालिकेने नियोजन केले आहे. त्यानुसार 21 खासगी रुग्णालयात मोफत लसीकरण सुरू केले आहे. तसेच शहरातील प्रमुख देवीच्या मंदिरासमोर देखील कोरोना चाचणी व लसीकरण मोहीम सुरू केली आहे. मागील दोन दिवसात खासगी रुग्णालयात 1848 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरणासाठी 68 केंद्र सुरू असून या केंद्रावर नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. तसेच आता उच्च न्यायालय, रेडक्रॉस, पोस्ट ऑफीस, विमानतळ, रेल्वेस्टेशन या ठिकाणी देखील लसीकरण सुरू करण्याचे नियोजन पालिकेने केले असल्याचे डॉ. मंडलेचा यांनी स्पष्ट केले.

आता कचर्‍याच्या वाहनांवरही जनजागृती : कोरोना लसीकरणाला वेग देण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाकडून नागरिकांना आवाहन करण्यासाठी रेड्डी कंपनीच्या कचर्‍याच्या वाहनांवर जनजागृती करण्याची ध्वनीफीत लावली आहे. कचरा आणण्यासाठी गल्लोगल्ली फिरणार्‍या या वाहनाव्दारे नागरिकांमध्ये जनजागृती केली जात असल्याचे डॉ. मंडलेचा यांनी नमूद केले.

घरोघरी लस न घेतलेल्यांचा शोध : शहरातील ज्या भागात कमी लसीकरण झाले, त्या भागातील घरोघरी जाऊन आशा वर्कर्स लस न घेतलेल्या नागरिकांचा शोध घेत आहे. ही माहिती घेऊन त्या भागातील नागरिकांना लसीकरण करून घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे.