औरंगाबाद : सततची डिझेल दरवाढ, टायर आणि बसेसच्या सुट्या भागांच्या दरातही झालेल्या वाढीमुळे अखेर एसटी महामंडळाने आज 25 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून भाडेवाढ लागु केली आहे. यामुळे औरंगाबाद- पुणे प्रवासभाडे 50 रुपयांनी वाढले आहे. त्यामुळे आता 290 रुपयाच्या ऐवजी 340 तर मुंबईसाठी प्रवाशांना 80 रुपये अधिकचे मोजावे लागणार आहे. तर कोल्हापुर बससाठी 100 रूपये अधिकचे द्यावे लागणार आहेत. 
सोमवार मध्यरात्रीपासून लागु करण्यात आलेल्या भाडेवाढीमुळे औरंगाबाहून विविध जिल्हे तालुके आणि विविध शहरासाठी वाढ झालेली भाडेवाढ निश्‍चित झाली आहे. त्यानुसार आता औरंगाबाद-पुणे 290 रुपयांवरून 340 रुपयांवर गेले आहे. याप्रमाणे औरंगाबाद-मुंबई 480 वरून 560 रुपये, औरंगाबाद-नाशिक 255 वरून 295 रुपये, औरंगाबाद-नागपुर 635 वरून 740 रुपये, औरंगाबाद-अकोला 320 वरून 375 रुपये, औरंगाबाद-अमरावती 440 वरून 515 रुपये, औरंगाबाद-नांदेड 365 वरून 425 रुपये, औरंगाबाद-बोरीवली 480 वरून 560 रुपये, औरंगाबाद-जालना 85 वरून 95 रुपये, औरंगाबाद-बीड 170 वरून 200 रुपये, औरंगाबाद-जळगाव 210 वरून 245 रुपये,  औरंगाबाद-बुलढाणा 180 वरून 210 रुपये, औरंगाबाद-भुसावळ 215 वरून 255 रुपये याप्रमाणे भाडेवाढ झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्याअंतर्गत चालवल्या जाणार्‍या एसटी बसेसच्या प्रवास दरातही वाढ झाली आहे. त्यानुसार औरंगाबाद-पैठण 70 वरून 80 रुपये, औरंगाबाद-कन्नड 75 वरून 90 रुपये, औरंगाबाद-सिल्लोड 85 वरून 95 रुपये, औरंगाबाद-गंगापुर 55 वरून 60 रुपये, औरंगाबाद-वैजापुर 105 वरून 125 रुपये, औरंगाबाद-सोयगाव 155 वरून 185 रुपये याप्रमाणे तिकिटाचे नवीन दर आता लागू होणार आहेत.

लातुर, कोल्हापुर, सोलापुरसाठी अधिक दरवाढ : आता औरंगाबाद ते लातुरसाठी 365 ऐवजी 435 रुपये मोजावे लागतील. तर  औरंगाबाद-कोल्हापुर मार्गावर 580 ऐवजी शंभर रूपये अधिक म्हणजे 680 रुपये प्रवाशांना अधिकचे द्यावे लागतील. तसेच औरंगाबाद-सोलापुर बससाठी 420 ऐवजी 490 रुपय भाडे आकारले जाणार आहे.