औरंगाबाद : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर औरंगाबाद शहर अनलॉक होताच औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हपलमेंट कॉर्पोरेशनने 8 जूनपासून 16 सिटीबस शहरवासीयांच्या सेवेत दाखल केल्या. त्यापाठोपाठच आता सोमवार दि.14 जूनपासून आणखीन सहा सिटीबस वाढवण्यात येत आहे. या सिटीबस चिकलठाणा ते रांजणगाव असा प्रवास करणार असून सोमवारपासून एकूण 22 बसेस शहरातील विविध रस्त्यांवर धावणार आहेत.
मे महिन्यापासून औरंगाबाद शहरात कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरूवात झाली. रुग्ण संख्या कमी झाल्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार 7 जूनपासून शहरातील सर्व व्यवहार सुरु करण्यास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंजुरी दिली. त्यामुळे 8 जूनपासून शहरातील प्रमुख 5 मार्गांवर 16 सिटीबस सुरु करण्यात आल्या. या सिटीबस दिवसभरात 241 फेर्‍या करीत आहेत. तथापि, नागरिकांकडून आणखीन सिटीबस सुरु करण्याची मागणी मागणी केली गेली. त्यामुळे आता 14 जूनपासून आणखीन 6 सिटीबस सुरु करण्याचा निर्णय स्मार्ट सिटी बस व्यवस्थापनाने घेतला आहे. याबाबत सिटीबस विभागाचे मुख्य चालन व्यवस्थापक राम पावनीकर, उपव्यवस्थापक सिध्दार्थ बनसोडे यांनी यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यातील 5 मार्गांवरील प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता मार्ग क्रमांक-19 चिकलठाणा ते रांजणगाव मार्गे सिडको बसस्टँड या मार्गावर सोमवारपासून आणखीन 6 सिटीबस सुरु केल्या जात आहेत. त्यामुळे आता एकूण 22 बसेस दिवसभरात 313 फेर्‍या पूर्ण करणार आहे. 

प्रवाशांनी काळजी घेणे आवश्यक :  प्रवाशांनी प्रवास करताना मास्क घालणे, सॅनिटायझरचा वापर करणे व आरोग्य विषयक सर्व सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. नियमांचे पालन करीत प्रवाशांनी सिटीबस सेवेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी 7507953828 या क्रमांकावर व्हॉटस्अँपच्या माध्यमातून संपर्क करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.