औरंगाबाद - येत्या 1 डिसेंबर रोजी मराठवाड्यातील आठही जिल्हयात पदवीधर मतदासंघाच्या निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. यावेळी मतदान करताना पदवीधर मतदारांनी योग्य पद्धतीने मतदान करून आपल्या मतदानाचा हक्क बजवावा, यासाठी मतदान करताना कोणकोणत्या बाबी लक्षात ठेवून मतदान करावे याविषयी निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.त्यानुसार एकाच उमेदवाराच्या नावासमोर नंबर एकचा पसंतीक्रमांक टाकणे बंधनकारक केले आहे.

मतदानासाठी मतदाराने केवळ मतपत्रिकेसोबत पुरविलेला जांभळया रंगाचा स्केच पेनचाच वापर करावा, याशिवाय इतर कुठलेही पेन, पेन्सिल, बॉलपाँईट पेन यांचा वापर करु नये. ज्या उमेदवारास मतदाराने पसंतीक्रम देण्यासाठी निवडले आहे, त्या उमेदवाराच्या नावासमोरील पसंतीक्रम असे नमूद केलेल्या रकान्यात 1 हा अंक नमूद करून मतदान करणे बंधनकारक राहील. निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या एकापेक्षा जास्त असली तरी 1 हा अंक केवळ एकाच उमेदवाराच्या नावासमोर नमूद करावा, निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या कितीही असली तरी मतदाराला जेवढे उमेदवार निवडणूक लढवित आहेत, तेवढे पसंतीक्रम नोंदविता येणार आहेत. उर्वरित उमेदवारांच्या नावासमोर पुढील पसंतीक्रम 2, 3, 4 इत्यादी अंक पसंतीक्रमानुसार ’पसंतीक्रम’ या स्तंभामध्ये दर्शवावा. कोणत्याही उमेदवारांच्या नावासमोर केवळ एकच अंक नमूद करणे गरजेचे आहे. एकच अंक एकापेक्षा जास्त उमेदवारांच्या नावासमोर नमुद करु नये.

पसंतीक्रम शब्दांत लिहू नका
पसंतीक्रम हा केवळ अंकात दर्शवावा. उदा.1, 2, 3 इत्यादी. तो एक, दोन, तीन इत्यादी असा शब्दात दर्शवू नये. अंक हे भारतीय आंतरराष्ट्रीय अंक स्वरुपात जसे 1, 2, 3 इत्यादी किंवा रोमन स्वरूपातील किंवा संविधानाच्या आठव्या अनुसुचितील भारतीय भाषेतील अंकाच्या स्वरुपात नोंदविता येतील, असे निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी कळवले आहे.

अन्यथा मतपत्रिका बाद
मतपत्रिकेवर मतदाराने स्वाक्षरी, आद्याक्षरे, नाव किंवा अंगठयाचा ठसा उमटवू नये. मतदाराने पसंतीक्रम दर्शविण्यासाठी मतपत्रिकेवर उमेदवाराच्या नावासमोर बरोबरची खूण किंवा फुली मारू नये. असे केल्यास ती मतपत्रिका बाद ठरेल. मतपत्रिका वैध ठरण्यासाठी उमेदवारांपैकी एकाच्या नावासमोर 1 हा अंक नमूद करून पहिला पसंतीक्रम दर्शविणे आवश्यक आहे. इतर पसंतीक्रम हे ऐच्छिक स्वरूपाचे आहेत. ते अनिवार्य नसल्याचे निवडणूक अधिकार्‍यांनी म्हटले आहे.