औरंगाबाद : उभारी 2.0 या उपक्रमातंर्गत आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा, त्यांच्या भविष्यातील नियोजनासाठी जिल्ह्यातील 2015 ते 2020 या कालावधीतील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांचे सर्वेक्षण करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांनी संबंधित सर्व तहसिलदार व नायब तहसिदार यांना गुरुवारी दि.20 दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांच्या दालनात जिल्ह्यातील सर्व तहसिलदार व नायब तहसिलदार यांच्याशी व्हीसीद्वारे जाधवर यांनी संवाद साधला. जाधवर यांनी जिल्ह्यातील सर्व तालुकानिहाय मागील पाच वर्षातील आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांचा आढावा घेतला. त्यात औरंगाबाद 76, फुलंब्री 100, पैठण 155, सिल्लोड 154, सोयगाव 64, कन्नड 113, खुलताबाद 42, वैजापूर 68, गंगापूर 67, अपर तहसील कार्यालय औरंगाबाद 1 असे एकूण 840 आत्महत्याग्रस्त शेतकरी असून मयत शेतकर्‍यांच्या कुटुंबास शासनाच्या विविध विभागांच्या कोणत्या योजनांचा लाभ देता येईल, याची निश्चिती करावी. कुटुंबनिहाय तपशील या कार्यालयास सादर करण्याचे निर्देश दिले. हा सर्वेक्षण अहवाल जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली होणार्‍या बैठकीत लवकरच सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे या कुटुंबियांना लवकरात लवकर विविध योजनांचा लाभ देणे शक्य होणार आहे.

आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना एक लाखापर्यंत अनुदान
मयत शेतकर्‍यांच्या कुटुंबियाना 1 लाख रुपये अनुदान शासनामार्फत देण्यात येते. शेतकरी कुटुंबातील कर्त्या व्यक्तीने आत्महत्या केल्यास कधीही भरुन न येणारे नुकसान होते. त्यामुळे या कुटुंबांच्या गरजांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे उभारी 2.0 हा उपक्रम सुरू केला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास भेट देवून त्यांच्या सामजिक व आर्थिक स्थितीविषयी माहिती संकलित करणे, विविध शासकीय योजनांचा प्राधान्याने लाभ देण्यासाठी नियोजन व अंमलबजावणी करणे आणि भविष्यातील नियोजनामध्ये काही नवीन उपाययोजनांचा समावेश करणे, ही या उपक्रमांची प्रमुख उद्दिष्टे आहेत.