औरंगाबाद : महापालिकेतील काही कर्मचार्‍यांनी एमएससीईटी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दिले नाही. या प्रमुख कारणावरून शेकडो कर्मचार्‍यांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे. सुमारे आठशे ते हजार कर्मचार्‍यांची वेतनवाढ रोखण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नियमानुसार अशाप्रकारे वेतनवाढ रोखण्याचा अधिकार प्रशासनाला नसल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.
राज्य शासनाकडून कर्मचार्‍यांना जुन महिन्यात वेतनवाढ व महागाई भत्ता मंजूर केला जातो. या धर्तीवरच औरंगाबाद पालिकेतील कर्मचार्‍यांना देखील वेतनवाढ व महागाई भत्ता देण्यात येतो. त्यामुळे दरवर्षी वेतनामध्ये आठ ते दहा टक्के रक्कम वाढते. यावर्षी मात्र लेखा परिक्षण अहवालामध्ये कर्मचार्‍यांच्या नियुक्तीवरून अनेक आक्षेप घेण्यात आले आहे. या आक्षेपाची पुर्तता आस्थापना विभागाकडून करवून घेणे गरजेचे आहे. मात्र मुख्य लेखा परिक्षकांनी थेट कर्मचार्‍यांची वेतनवाढ रोखण्याची सूचना संबंधित विभागाला केली आहे. ज्या कर्मचार्‍यांनी एमएससीईटी परीक्षा उत्तीर्ण करून प्रमाणपत्र सादर केले नाही, अशा कर्मचार्‍यांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे. वेतनवाढ व महागाई भत्ता रोखण्याचा कोणताही नियम नाही. जर कर्मचार्‍याची एखाद्या प्रकरणात चौकशी होऊन समितीने शिफारस केली असेल तरच त्या कर्मचार्‍यांची वेतनवाढ रोखली जाऊ शकते. मात्र पालिकेत सरसकट आठशे ते हजार कर्मचार्‍यांची वेतनवाढ व महागाई भत्ता रोखण्यात आला आहे. यासंदर्भात वरिष्ठ अधिकार्‍यांशी संपर्क साधला त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.