खुलताबाद : खुलताबाद-औरंगाबाद महामार्गावर गेल्या चार वर्षांत 440 अपघात झाले असून यात गंभीर जखमींना वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे अपघातातील जखमींना तत्काळ उपचार मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अयाज बेग यांनी खुलताबाद येथे ट्रामा केअर सेंटर उभारण्यात यावे. अशी मागणी निवेदनाद्वारे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नुकताच गंगापूर व वैजापूर तालुक्याच्या दौरा केला. यादरम्यान खुलताबाद नगरपालिकेचे नगरसेवक अयाज बेग यांनी मंत्री टोपे यांची भेट घेत हे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, खुलताबाद तालुक्यातील जगप्रसिद्ध वेरूळ लेण्या, मिनी महाबळेश्वर सारखे व पर्यटन स्थळे असलेले म्हैसमाळ, सुलिभंजन दत मंदिर, शहरातील औरंगजेब यांची समाधी, जरजर बक्ष  यांची दर्गा त्याचप्रमाणे भद्रा मारोती मंदिर, वेरूळ घृष्णेश्वर मंदिर असे धार्मीक क्षेत्र व पर्यटन स्थळे आहेत. यामुळे या तालुक्यात दररोज हजारो पर्यटकांसह शेकडो प्रवाशी औरंगाबाद-खुलताबाद महामार्गावरून प्रवास करत असतात.तालुक्यातील रस्त्यावर रहदारी जास्त असल्याने नेहमी अपघात होत असतात. दरम्यान अपघात, दुर्घटना अपातकालीन परिस्थिती  नंतर जखमींना लवकरात लवकर वैद्यकीय सेवा मिळावी या हेतुने खुलताबाद रुग्णालय येथे ट्रामा केअर सेंटरची आवश्यकता आहे.खुलताबाद तालुक्यात गेल्या चार वर्षांत 440 अपघात झालेले असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. 
खुलताबाद येथे ट्रामा केअर सेंटर नसल्याने अपघात ग्रस्ताना व इतर रुग्णास तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध होत नाही व  गंभीर जखमींना उपचारासाठी औरंगाबाद घाटी येथे न्यावे लागलेले आहे. आणि खुलदाबाद ते औरंगाबाद 25 कि.मी.अंतर असल्याने सदरील जखमींचा बर्‍याचवेळा मृत्यू होतो या कारणाने खुलताबाद शहरामध्ये ट्रामा केअर सेंटर, 24 तास डॉक्टर, आयसीयू, नर्सिंग होम, पॅथॉलॉजी लॅब, एक्सरे व इतर सोय सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.