औरंगाबाद : उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतकर्‍यांना गाडीखाली चिरडण्याच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित केलेल्या राज्यव्यापी बंदला औरंगाबादेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचा दावा पदाधिकार्‍यांनी केला आहे. दुकाने बंद करण्यासाठी तिन्ही घटक पक्षातील पदाधिकार्‍यांनी शहरातील विविध भागात फिरून दुकाने बंद करण्यासाठी आवाहन करण्यासाठी फेरीदेखील काढली होती.
 लखीमपूर येथे शेतकर्‍यांना चिरडण्याच्या घटनेवरून भाजप सरकारविरोधात सर्वत्र संतापाचे वातावरण आहे. याअंतर्गत महाविकास आघाडी सरकारकडून आज सोमवारी दि.11 ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी बंदचे आवाहन केले होते. या अनुषंगाने औरंगाबादेत देखील दुकाने बंद केली असल्याची माहिती काँग्रेस सेवादल प्रदेशाध्यक्ष विलासबापू औताडे यांनी आदर्श गावकरीशी बोलताना दिली. सदरील बंद यशस्वी व्हावा, यासाठी सरकारमधील तिन्ही घटकपक्षातील पदाधिकार्‍यांनी सोमवारी सकाळी शहरात विनंती फेरी काढली. क्रांतीचौक येथे सदरील घटनेचा निषेध नोंदवून फेरीला प्रारंभ करण्यात आला. सदरील विनंती फेरीत पृथ्वीराज पवार यांच्यासह शिवसेनेतर्फे आ. अंबादास दानवे, माजी खा. चंद्रकांत खैरे, नंदकुमार घोडेले, काँग्रेसचे नामदेव पवार, डॉ. कल्याण काळे, हिश्याम उस्मानी, जितेन्द्र देहाडे, रामुकाका शेळके, किरण पाटील डोणगावकर, सुरेखा पानकडे, इकबालसिंग गिल, संदीप शेळके, चाऊस, काँग्रेस सेवादलातर्फे विलासबापू औताडे, अनिल मानकापे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय साळवे, कदिर मौलाना, अभिषेक देशमुख, शेख कय्युम, दत्ता भांगे यांच्यासह बबन डिडोरे, मोतीलाल जगताप, संतोष लोखंडे आदी शिवसेना,काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, दुकानदारांनी विषयाचे गांभीर्य पाहता उत्स्फूर्त बंद पाळून बंद यशस्वी केल्याचे काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलासबापू औताड़े यांनी म्हंटले आहे.

मयत शेतकर्‍यांना वाहिली श्रद्धांजली : क्रांतीचौकातून विनंती फेरी पुढे गुलमंडी, पैठण गेट, सिटी चौक, गांधीपुतळापर्यंत पायी फिरून दुकानदारांना दुकाने बंद करण्यासाठी विंनती करण्यात आली. याला प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवण्यात आल्याचा दावा पदाधिकार्‍यांनी केला. टीव्ही सेंटर, जाधववाडी, सिडको कॅनॉट, चिकलठाणा, गारखेडा, पुंडलिकनगर, गजानन महाराज मंदिर चौक, जवाहर कॉलनी, त्रिमूर्ती चौक, निराला बाजारमार्गे क्रांती चौक येथे फेरीचा समारोप करण्यात आला. याठिकाणी भाजप सरकारचा निषेध नोंदवून मयत शेतकर्‍यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

महिला आघाडी एकजुटीने रस्त्यावर : महाविकास आघाडीच्या नेत्यांप्रमाणेच विनंती फेरीत तिन्ही पक्षांच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या देखील एकजुटीने सहभागी झाल्या होत्या. महिला आघाडीने विविश भागांतील बाजारेपठांत जावून व्यापार्‍यांना दुकाने बंद करण्याची विनंती केली.