औरंगाबाद  : एमआयडीसी कार्यालयातील कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे एका दुर्मीळ पक्षाचे प्राण वाचले. हा पक्षी कार्यालयाच्या आवारात अचानक कोसळून पडला. कर्मचार्‍यांनी लगेच विनविभागाच्या अधिकार्‍यांना बोलावले. सध्या या पक्षावर उपचार सुरू असून दोन दिवसांत तो बरा होऊन उंच भरारी घेईल, असे उपचार करणार्‍या डॉक्टरांनी म्हटले आहे.
  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कार्यालयाच्या परिसरात शनिवारी एक दुर्मीळ पक्षी अचानक कोसळून पडला. या घटनेत पक्षाला मोठी जखम झाली. ही बाब तेथे उपस्थित सहायक अशोक रसाळ, कनिष्ठ सहाय्यक संजय जाधव, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल दांडगे यांच्या लक्षात आली. त्यांनी ताबडतोब वनविभागाचे अधिकारी रंजन देसाई, अप्पासाहेब तगड यांच्याशी संपर्क साधून सदरील घटनेची माहिती असता तत्काळ वनमजुर डी.एन. जाधव हे घटनेच्या ठिकाणी हजर झाले. डी.एन. जाधव यांनी वेळ न लावता पक्षाला वनविभागाच्या रूग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले. या पक्षाच्या डोक्याला व पायाला जखम झाल्याचे उपचारादरम्यान स्पष्ट झाले. सध्या या पक्षावर उपचार सुरू आहेत. पक्षाची दोन दिवसात प्रकृती स्थिर होऊन तो पुन्हा आकाशात उंच भरारी घेईल, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.