औरंगाबाद : सातारा परिसरातील ऐतिहासिक खंडोबा मंदिराचा जिर्णोद्धार केला जाणार आहे. यासाठी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पुरातत्व विभागाला सर्वेक्षण करून सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार नाशिकच्या पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांनी मंगळवारी दि.26 ऑक्टोबर रोजी खंडोबा मंदिराच्या सर्वेक्षणाचे काम सुरू केले. त्यानंतर सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करून सादर केला जाणार आहे. 
 सातारा येथील खंडोबा मंदिर हे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेले आहे. या मंदिराची ऐतिहासिक वास्तू म्हणून राज्य पुरातत्व विभागाच्या दप्तरी नोंद आहे. खंडोबा मंदिराचा जिर्णोद्धार करावा, अशी मागणी पश्चिम विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय शिरसाठ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याशी चर्चा करून जिल्हा प्रशासनाकडून प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी 9 सप्टेंबर रोजी खंडोबाचे दर्शन घेऊन मंदिराची पाहणी केली. यावेळी आमदार संजय शिरसाठ यांनी मंदिराचा जिर्णोद्धार करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तयावर पालकमंत्री देसाई यांनी जिल्हा प्रशासनाला डीपीआर तयार करून सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार नाशिक येथील राज्य पुरातत्व विभागाचे अधिकारी कासार पाटील यांच्या नेतृत्वाखाली सात अधिकार्‍यांचे पथक मंगळवारी खंडोबा मंदिराच्या मंदिरात दाखल झाले. पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांनी गाभार्‍यातील दगडी रेखीव कामाचे निरीक्षण करून दगडाची लांबी, रुंदीचे मोजमाप केले. तसेच दगडी खांबावरील नक्षीकाम, दगडाचा प्रकार, बांधकामासाठी वापरण्यात आलेले साहित्य, दिपमाळ, मंदिरांसाठी वापरण्यात आलेल्या विटा व चुना, त्यावरील नक्षीकाम याची अत्यंत बारकाईने पाहणी करून सर्वेक्षण केले.  

आजही सुरू राहणार सर्वेक्षण : उद्या बुधवारी दि.27 ऑक्टोबर रोजी देखील हे पथक मंदिराचे सर्वेक्षण करणार आहे. सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर सविस्तर प्रकल्प आराखडा तयार (डिपीआर) करून जिल्हा प्रशासनाला सादर केला जाणार आहे. यावेळी खंडोबा मंदिर संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष साहेबराव पळसकर, सचिव गंगाधर पारखे, विश्वस्त मोहन काळे, दिलीप दांडेकर, विठ्ठल देवकर, शिवसेनेचे उपशहरप्रमुख रमेश बहुले आदींची उपस्थिती होती.