औरंगाबाद : कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कारणांचा शोध प्रशासनाने घेतला असून, या अभ्यासातून आवश्यक असणार्‍या उपाययोजनांबाबत आरोग्य यंत्रणांनी कार्यवाही करून जिल्ह्यात कोविड रुग्णाचा मृत्यू न होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी अधिकार्‍यांना केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवार, 30 रोजी आयोजित जिल्हास्तरीय कोविड आढावा बैठकीत चव्हाण बोलत होते. या बैठकीस मनपाचे अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे, संगीता सानप, रिता मैत्रेवार, संगीता चव्हाण, मंदार वैद्य, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, डॉ. नीता पाडळकर, पर्यटन विभागाचे उपसंचालक श्रीमंत हारकर, डॉ. लड्डा, डॉ. विजयकुमार वाघ, अजोय चौधरी आदी उपस्थित होते. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे, चाचण्यांवर भर देणे, रिक्षा चालक, भाजी विक्रेते, दूध विक्रेते, दुकानदार आदी सुपर स्प्रेडर व्यक्तींचीही चाचणी करण्याबाबत त्यांनी आरोग्य विभागाला सूचित केले. जिल्ह्यात 24 ठिकाणी ऑक्सीजन प्लांटपैकी चार प्लांट उभारलेले असून उर्वरीत प्लांट लवकरात लवकर उभारण्याबाबतही त्यांनी सांगितले.

डॉक्टरांना प्रशिक्षण : संभाव्य तिसर्‍या लाटेचा बालकांना धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत असल्याने त्या दृष्टीनेही प्रशासनाने उपाययोजना केलेल्या आहेत. यामध्ये आयसीयू, व्हेंटीलेटरसह एकूण 631 बेड बालकांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. यामध्ये 45 व्हेंटीलेटरचा समावेश आहे. या व्यतिरिक्त अजून 28 व्हेंटीलेटर सीएसआर निधीतून उपलब्ध झालेले आहेत. जवळपास 300 डॉक्टरांना लहान बालकांना हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.