औरंगाबाद : देशभर कोरोना चाचणीत फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे ही फसवणूक टाळण्यासाठी आता औरंगाबाद महापालिकेने चाचणी अहवालावर क्यूआर कोडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अशा प्रकारची सुविधा देणारी औरंगाबाद पालिका देशात पहिलीच असल्याचा दावा पालिकेने केला आहे.  औरंगाबाद शहरात गेल्या वर्षभरात सुमारे पाच लाखापेक्षा अधिक जणांनी आरटीपीसीआर चाचण्या केल्या आहेत. त्यांचे क्यूआर कोड असलेले अहवालऔरंगाबाद स्मार्ट सिटीच्या माझी हेल्थ माझ्या हाती अ‍ॅपवर उपलब्ध असल्याचेही पालिकेने कळवले आहे. या अहवालावर क्यूआर कोड असल्यामुळे अहवाल खरा असल्याची खात्री पटते, खोटे अहवाल देऊन फसवणूक करण्याच्या प्रकारांना आळा बसेल, असा दावा पालिकेने केला आहे. देशाअंतर्गत व आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करताना तसेच इतर ठिकाणी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. त्यामुळे अनेक जण छेडछाड करून बोगस अहवाल काढत असल्याचे समोर आले आहे. पॉझिटिव्हचे निगेटिव्ह करता येऊ शकते, असे सांगितले जाते. या फसवणुकीवर उपाय म्हणून पालिका व स्मार्ट सिटीच्या टीमने पुढाकार घेऊन देशात सर्वात प्रथम आरटीपीसीआर अहवालावर क्यूआर कोडची सुविधा सुरू केलीआहे. एमएचएच प (माझे आरोग्य माझ्या हाती) तयार करणारा युवा संशोधक नागेश डोंगरे व त्यांच्या सहकार्यांनी यास सहकार्य केले. पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली असे अहवाल देणे सुरू केले आहे.

असा मिळेल क्युआर कोडद्वारे अहवाल : व्यक्तीने चाचणी केल्यानंतर नोंदवलेल्या मोबाइल क्रमांकावर एक मेसेज येतो. त्यात तुमचा एसआरएफआई आयडी नमूद असेल. त्यानंतर 12 तासानंतर मेसेद्वारे एक लिंक येईल. त्या लिंकवर आपला एसआरएफआयडी आणि मोबाइल नंबर टाकल्यास तुमची चाचणी पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे कळेल. याच अहवालात तुमच्या चाचणीचा क्यूआर कोड देखील असेल. तसेच पालिकेचा माझी हेल्थ माझ्या हाती, या अ‍ॅप डाऊनलोड करून त्यातील रिपोर्ट यावर क्लिक करणे, नोंदणी केलेला मोबाइल क्रमांक आणि एसआरएफ आयडी टाकल्यास क्यूआर कोड असलेला अहवाल उपलब्ध होईल, असे पालिकेने कळवले आहे.