औरंगाबाद : जिल्ह्यातील खासगी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कामगार, वॉर्डबॉय व दवाखान्यातील काम करणारे सर्व कर्मचारी यांची माहिती जवळ असलेल्या शासकीय रुग्णालयात तात्काळ द्यावी. जेणेकरुन संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात येणार्‍या कोरोना लसीपासून ते वंचित राहणार नाहीत, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी खासगी रुग्णालयांना केले आहे.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना लसीकरण तयारीच्या अनुषंगाने जिल्हा कार्यदल समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी दि.27 घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.नीता पाडळकर, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, सर्व्हलन्स वैद्यकीय अधिकारी डॉ. मुजिब सय्यद, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ, सहायक संचालक कुष्ठरोग डॉ. ए.बी. धानोरकर, सहायक संचालक (हिवताप) डॉ. कल्याणकर आदींची उपस्थित होती. पहिल्या टप्यामध्ये सर्व शासकीय व खासगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, सफाई कामगार, वॉर्डबॉय व दवाखान्यातील काम करणारे सर्व कर्मचारी यांना कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सर्व अधिकारी व कर्मचारी यांची माहिती सीव्हीबीएमएस या डाटाबेसवरती भरावयाची आहे. महापालिकेत आतापर्यंत खाजगी रुग्णालयांनी सदर माहिती दिली आहे.

दीड हजार रूग्णालयांची माहिती बाकी
अद्याप 1,441 रुग्णालयांनी माहिती दिलेली नाही. जिल्हयातील ग्रामीण व नागरी भागातील एकूण 160 खाजगी रुग्णालयांकडून सदर माहिती दिली आहे. अद्याप 325 रुग्णालयांची माहिती अप्राप्त आहे, असेही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी नमूद केले आहे.

नागरिकांनीही रूग्णालयांना विचारणा करावी
नागरिकांनी खासगी रूग्णालयात उपचारासाठी अथवा सल्ला घेण्यासाठी गेल्यास तिथे असणार्‍या डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कामगार, वॉर्डबॉय व दवाखान्यातील काम करणारे सर्व कर्मचारी यांनी पहिल्या टप्प्यातील कोरोना लसीकरणासाठी माहिती शासनाला दिलेली आहे का, याबाबत विचारणा करावी. याबाबत त्यांना आग्रह करण्याचे आवाहन नागरिकांना जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे.