औरंगाबाद- दिल्ली, गुजरात राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. याच पार्श्‍वभूमीवर औरंगाबाद शहरातही कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. यातच आता रेल्वे आणि विमानाने बाहेरून येणारे प्रवाशी देखील कोरोना पॉझिटिव्ह महापालिकेने खबरदारी घेतली आहे. बाहेरून येणारे प्रवाशांना थेट शहरात न जाऊ देता त्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. यातून आजवर सचखंड एक्स्प्रेसमधून 22 प्रवाशी पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली आहे. प्रवाशांच्या माध्यमातून शहरात कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

शहरात दिवाळीच्या दिवसांत बाजारपेठांत झालेल्या गर्दीमुळे आता कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मागील पाच दिवसापासून शंभरपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहे. यावर आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली आहे. पालिकेने रेल्वेस्टेशनवर बाहेरगावाहून येणार्‍या प्रवाशांची कोरोना चाचणी सुरु केली आहे. त्याकरिता आरोग्य विभागाने दोन पथके तैनात केली आहेत. सचखंड एक्स्प्रेस रेल्वेने दररोज दिडशे ते अडीचशे प्रवाशी शहरात दाखल होत आहे. या सर्व प्रवाशांची अ‍ॅन्टिजेन आणि आरटीपीसीआर कोरोना चाचणी केली जात आहे. आतापर्यंत सचखंडने आलेल्या प्रवाशांपैकी 22 प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यासोबतच विमानतळावर देखील पालिकेचे एक पथक तैनात केले आहे. विमानाने येणार्‍या प्रवाशांची आरटीपीसीआर पध्दतीने कोरोना चाचणी केली जात असून या चाचणीचा अहवाल एक दिवस उशिराने मिळत आहे. आतापर्यंत विमानाने आलेल्या प्रवाशांपैकी चार प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत.

शुक्रवारी 266 प्रवाशांची चाचणी
सचखंड एक्स्प्रेसने शुक्रवारी येणार्‍या 217 प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. काल केलेल्या चाचणीतून 3 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तसेच औरंगाबाद विमानतळाव दिवसभरात 49 विमान प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. विमानळावरील काल गुरूवारी केलेल्या चाचण्यांतून दोघांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.

दुर्लक्ष करून चालणार नाही
विमान व रेल्वेने येणार्‍या प्रवाशांच्या तुलनेत कोरोना पॉझिटिव्ह निघणार्‍यांची संख्या कमी असली तरी कोरोनाचा धोका वाढण्याची भिती यामुळे निर्माण झाली आहे. यासंदर्भात पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले की, रेल्वे आणि विमानाने येणार्‍या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात आहे. या चाचणीमुळे काही प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहे. ही चिंताजनक बाब असून याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.