पैठण (मुफीद पठाण) : जागतिक बँकेच्या माध्यमातून हायब्रीड एन्यूमेटी योजनेतून 120 कोटी रुपये निधीतून बांधण्यात येत असलेल्या दोन पदरी पैठण-पाचोड महामार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. 30 किलोमीटर लांबी असलेल्या या रस्त्याचे 99 टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, या नवीन बांधकाम करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामावर प्रश्‍न उभे राहिले असून काम पूर्ण होण्या आधीच  निकृष्ट व दर्जाहीन काम झाल्याने रस्त्याला भल्या मोठ्या भेगा पडल्याचे दिसून येत आहे. यामुळे मोठ्या अपघाताची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
पैठण-पाचोड हा महामार्ग तालुक्यासाठी खूप महत्वाचा समजला जातो. दरम्यानच्या काळात या महामार्गाची मोठी वाताहत झाली होती. रस्ता खराब असल्याने वाहनांची वर्दळही कमी झाली होती. खड्ड्यांचे साम्राज्य असलेल्या या मार्गावर कोणीही जाण्यास धजावत नव्हते. अखेर जागतिक बँकेच्या माध्यमातून या मार्गासाठी निधी उपलब्ध झाला. रस्त्याचे काम सुरू झाले. परिसरातील नागरिकांसह वाहनधारकांनाही दिलासा मिळाला. पैठणपासून थेट पाचोडकडे जाण्यासाठी हा मार्ग जवळचा आणि सोपा असल्याने वाहनांची वर्दळही मोठ्या प्रमाणात असते. रस्ता गुळगळीत झाला मात्र, झालेले काम दर्जाहिन झाल्याने धोका वाढला आहे. पैठण शहरापासून चार किलोमीटर अंतरावरील बाळराजा पुलाचा भराव खचला असून त्यामुळे जवळपास 5 इंच रुंद व वीस ते पंचवीस फूट लांब मोठ्या भेगा पडल्याने मोठ्या अपघाताची भीती वाहनधारक व्यक्त करण्यात आहे. त्यातच पावसाळ्याचे दिवस असल्याने एखादे मोठे अवजड वाहन पुलावरून  गेल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

दरम्यान रस्त्याचे काम करणारे ठेकेदार कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर टोलच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्‍न चिन्ह उभे राहिले आहे. या संपूर्ण रस्त्याची थर्ड पार्टी चौकशी करण्याची मागणी नागरिकांसह वाहनधारकांनी केली आहे.