औरंगाबाद  : जिल्ह्यातील वाकला-चांदेश्वर हा जलप्रकल्प अत्यंत आवश्यक व नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे. त्यामुळे खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबई येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेवुन हा प्रकल्प जलसंपदा विभागाकडूनच पुर्ण करुन घेण्याची मागणी केली. त्याअनुषंगाने मंत्री जयंत पाटील यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाला वाकला-चांदेश्वर प्रकल्प जलसंधारणकडून जलसंपदा विभागाकडे हस्तांतरीत करुन काम त्वरीत पूर्ण करण्याचे आदेश दिले.
मागील काही दिवसांपासून वैजापूर तालुक्यातील वाकला-चांदेश्वर जलप्रकल्प तांत्रिक अडचणी व काही कारणास्तव शासनस्तरावर प्रलंबित आहे. सुरवातीला हा मूळ प्रकल्प जलसंपदा विभागाकडूनच पुर्ण होणार होता. मात्र 600 हेक्टर्सपेक्षा कमी सिंचनक्षमता असल्याचे कारण पुढे करून जलसंपदा विभागाकडून जलसंधारण विभागाकडे हस्तांतरीत करण्याचे शासन स्तरावरुन आदेश जारी करण्यात आले होते. जलसंधारण विभागाकडे अनुभवी नसणार्‍या मनुष्यबळाचा विचार केल्यास हा प्रकल्प सर्व्हेक्षण व बांधकामासाठी जलसंपदा विभागाकडेच ठेवणे योग्य असल्याचे सर्वांचे एकमत होते. यासाठी खा. जलील यांनी सतत तीन वर्षे यशस्वी पाठपुरावा केला. त्यामुळे अखेर हा जलप्रकल्प जलसंपदा विभागाकडे हस्तांतरीत करुन काम त्वरीत पुर्ण करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास मंडळाला जारी केले.

 पंचक्रोशीतील शेतकर्‍यांना फायदा : हा जलप्रकल्प त्वरीत पुर्ण झाल्यास घाटमाथ्यावरील कुसूमतेल, जातेगाव, वाकला, जवळकी, गोंडेगाव, चांदेश्वर व तलवाडा यासह इतर गावांना पाणी पुरवठा करण्यास मदत होईल. पंचक्रोशीतील शेतकर्‍यांच्या विहीरीची पाणी पातळीत सुध्दा वाढ होणार आहे. डोंगराळ भागातील वन्यप्राण्यांना देखील उन्हाळ्यात पिण्याचे पाणी उपलब्ध होईल. वाकला-चांदेश्वर हा जलप्रकल्प पुर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने समस्त ग्रामस्थ व शेतकर्‍यांनी खा. जलील यांचे आभार व्यक्‍त केले आहे.