औरंगाबाद (ऋषिकेश श्रीखंडे) : मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्य सरकारने राज्यातील आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला मराठा क्रांती मोर्चाने थेट विरोध दर्शवला आहे. कोरोना संकटाच्या नावाखाली राज्य सरकारला मराठा समाजातील विद्यार्थ्यांना डावलून ज्या काही भरती प्रक्रिया राबवायच्या आहेत, त्या खुशाल राबवाव्यात. कोरोना संकट निस्तरल्यानंतर मराठा क्रांती मोर्चा जशाला, तसे उत्तर देणार आहे, असे रोकठोक मत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी मांडले आहे.

मराठा समाजाला शिक्षण आणि नोकर्‍यांमध्ये आरक्षण देणारा महाराष्ट्र सरकारचा सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग कायदा 2018 सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने बुधवारी रद्द ठरवले आहे. या निकालानंतर राज्यात संतापाची लाट असतानाच  राज्य सरकारने आरोग्य विभागाची पद भरती करण्याचा निर्णय घेऊन यात तेल ओतले आहे. त्यामुळे, राज्यातील मराठा समाज आणखीच पेटला आहे. यासंबंधी मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची भूमिका काय आहे याची विचारणा केली असता, त्यांनी या भरतीला प्रक्रियेला विरोध केला आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यातील मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांसोबत व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून संवाद सुरू आहे. या संवादाच्या माध्यमातून सगळ्यांच्या एकमताने मराठा क्रांती मोर्चाची राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात पुढील दिशा ठरवणार आहे. तसेच, मराठा समाजासोबत जो घात पात झाला, त्याला मराठा समाज जशाला तसे उत्तर देणार आहे, असे देखील इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्यवक रमेश केरे यांनी दिला आहे.

मेटे यांचा मराठा क्रांती मोर्चाशी संबंध नाही 
 आमची लढाई आता केंद्र आणि राज्य सरकारसोबत आहे. पुढील दिशा ठरवण्याची तयारी सुरू आहे. विनायक मेटे यांनी 16 तारखेला जो मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे, तो त्यांच्या शिवसंग्रामचा वैयक्तीक निर्णय आहे. त्यांचा आणि मराठा क्रांती मोर्चाचा अर्थाअर्थी संबंध नाही. मेटे यांनी आमच्याशी कुठलाही संपर्क साधलेला नाही. मराठा क्रांती मोर्चा ठरवताना मेटे कुठेच नव्हते. त्यांचा काहीही संबंध नव्हता. मेटे मोर्चात सहभागी झाले असतील, पण त्यांचा मराठा क्रांती मोर्चाशी अर्थाअर्थी संबंध नाही. मेटे आणि केंद्राची युती आहे. मेटे यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन, मराठा आरक्षणाविषयी बोलावे. 
रविंद्र काळे, मराठा क्रांती समन्वयक.