औरंगाबाद : गारखेडा परिसरातील हुसेन कॉलनीत दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा प्रत्यक्षदर्शी असलेला तरुण दिसताच त्याला फिल्मी स्टाईल मारहाण करुन भरचौकात पाच जणांनी ओढत नेले. हा खळबळजनक प्रकार रविवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास न्यू हनुमाननगरातील गल्ली क्रमांक 2 मध्ये घडला. याच पाच जणांनी लोखंडी रॉड, चाकूने भोसकत आणि दगडाने ठेचून त्याची निर्घूण हत्या केली. मारहाण सुरु असताना मदतीसाठी टाहो फोडत असलेल्या या तरुणाच्या तोंडात निर्दयी आरोपींनी माती कोंबली. तसेच आकांताने विव्हळत असताना त्यांच्या तोंडावर लघुशंका करुन त्याचा व्हिडीओ काढून मारेकरी पसार झाले. हा धक्कादायक प्रकार गुन्हेगारांच्या दहशतीमुळे शेकडो नागरिक फक्त बघ्यांच्या भूमिकेत होते.  
  आकाश रुपचंद राजपूत (21, रा. अजिंक्यनगर, गारखेडा परिसर) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी सोमवारी दि.9 ऑगस्ट रोजी पहाटे पाच जणांना घरातून अटक केली. न्यू हनुमाननगरातील मृत आकाश राजपूत हा सागर केशभट या मित्रासोबत फर्निचरची कामे करायचा. दोन दिवसांपुर्वी कुख्यात गुन्हेगार गणेश रविंद्र तनपुरे (19, रा. गल्ली क्र. 2, न्यू हनुमाननगर) याचे आकाशच्या  मित्रासोबत हुसेन कॉलनीत भांडण झाले होते. त्यावेळी तेथे सागर देखील उपस्थित होता. त्याचा राग गणेशच्या मनात खदखदत होता. रविवारी रात्री सागर आणि आकाश दिसताच त्याने दोघांना गल्लीत रोखले. तनपुरेची परिसरात दहशत असल्याने त्याला पाहून सागर तेथून पळून गेला. मात्र, तेवढ्यातच आकाशला पकडून ठेवले. आकाशने आरडाओरड सुरु करताच तेथे गणेशचा भाऊ ऋषीकेश रविंद्र तनपुरे (21), मेव्हणा राहुल युवराज पवार (24) आणि संदीप त्रिंबक जाधव (45, मुळ रा. आंबेडकरनगर) हे तेथे आले. त्यांनी आकाशला ओढतच बाजुला असलेल्या त्यांच्या घराच्या दिशेने नेले. तेथे लोखंडी रॉडने मारहाणीला सुरुवात केली. त्याच्या पायाच्या नळघ्या, दोन्ही गुडघे आणि डोके फोडले. आकाश जमिनीवर कोसळताच गणेशची आई मंगल रविंद्र तनपुरे (40) हिने त्याला दगडाने मारले. तर गणेश आणि ऋषीकेशने चाकूने भोसकले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आकाश विव्हळत नागरिकांकडे मदतीसाठी याचना करु लागला. मात्र या गुन्हेगारांनी त्याच्या तोंडात माती कोंबली. त्यामुळे त्याचा आवाजही बाहेर निघत नव्हता. जवळपास दहा मिनिटे हा फिल्मीस्टाईल थरार सुरु होता. मात्र, शेकडो नागरिक केवळ बघ्याच्या भूमिकेत राहिले.

पोलीस आयुक्तांना गुंडांचे आव्हान :  नव्याने शहरात रुजू झाल्यावर पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी गुंडागर्दी खपवून घेणार नाही, अशी भूमिका घेतली होती. मात्र आता पोलीस आयुक्तांना 19 वर्षीय नव्या गुन्हेगारानेच आव्हान दिले आहे. हनुमानगरातील या तनपुरे कुटुंबाची परिसरात प्रचंड दहशत आहे. चोरी, मारामारी, अवैध धंद्यांमध्ये हे अख्खे कुटुंब पुढे होते. शेजार्‍यांना त्रास देणे, पेट्रोल चोरणे, रात्री-अपरात्री कोणाच्याही घरात शिरुन दिसेल ते उचलणे, महिला, मुलींच्या अंगावर हात टाकण्याचे प्रकारही गणेश आणि ऋषीकेश करायचे. त्यामुळे या भागातील नागरिक तनपुरे कुटुंबाला अक्षरश: वैतागले आहेत.

अनेक नागरिकांची घरे विक्रीला : न्यू हनुमाननगरातील गणेश, ऋषीकेश आणि त्यांची आई मंगल तनपुरे यांच्या दहशतीला परिसरातील नागरिक वैतागले आहेत. त्यामुळे अनेकांनी त्यांची अलिशान घरे विक्रीला काढली आहेत. यात एका शासकीय  अधिकार्‍याचा देखील समावेश आहे. 15 ते 60 लाख रुपयांपर्यंतची ही घरे आहेत. अनेक वर्षांपासून स्थायिक असलेले नागरिक आर्थिक नुकसान सहन करुन परिसर सोडून दुसरीकडे राहायला जाण्याच्या विचारात आहेत.

तनपुरेंच्या नावाने फोडला हंबरडा : आकाशला बेदम मारहाण केल्याची माहिती मिळाल्यानंतर पुंडलिकनगर पोलीस ठाण्यातील जमादार बाळाराम चौरे, सुखदेव कावरे आणि पोलीस मित्र अक्षय दाभाडे यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. आकाशला लगेचच पोलीस वाहनातून घाटीत दाखल करण्यात आले. त्यावेळी आकाशचा भाऊ प्रविण आणि आई मथुराबाई हे देखील सोबत आले. घाटीच्या दिशेने जात असताना आकाश प्रचंड विव्हळत होता. त्याने आपल्याला अख्ख्या तनपुरे कुटुंबियांनी मारहाण केली. साहेब त्यांना सोडू नका, असे म्हणत होता.