औरंगाबाद : विद्युत सहायक पदभरतीसाठी जाहिरातीमध्ये एस.एस.सी. परीक्षेतील बेस्ट ऑफ फाइव्हच्या आधारे मिळालेल्या गुणांची नोंद निवडीसाठी ग्राह्य धरली जाणार नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले होते. मात्र ऑनलाइन प्रणालीत बेस्ट ऑफ फाइव्हच्या आधारे मिळालेल्या गुणांची नोंद झाल्याने हायकोर्टात याविरोधात दाद मागण्यात आली आहे. या याचिकेवर 22 ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
महावितरणने विद्युत सहायक पदाच्या एकूण पाच हजार पदांसाठी सरळ सेवा भरती करीता ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले आहे. सदर परीक्षेत प्राप्त झालेल्या एकूण सरासरी गुणांच्या आधारे ऑनलाइन अर्जामध्ये नोंद करावी व प्रामुख्याने एस.एस.सी. परीक्षेतील बेस्ट ऑफ फाइव्हच्या आधारे मिळालेल्या गुणांची नोंद निवडीसाठी ग्राह्य धरली जाणार नसल्याचे जाहिरातीत प्रामुख्याने नमूद केले होते. निवड यादीनुसार एकूण 4,534 उमेदवारांची निवड केल्याचे नमुद केले आहे. तसेच 4 ऑक्टोबर रोजी साक्षांकीत केलेल्या निवड यादीप्रमाणे विविध प्रवर्गांकरिता आरक्षित केलेल्या पदांचा तपशील नमूद केला आहे. या निवड यादीला प्रकाश गायकवाड, योगेश रामराव खांडरे, महेश चौधरी, सुजीत बोदमवाढ, प्रदीप हमंद, महेश साखरे, शिवानंद जिद्देवाड, सुमीत माकोडे, निखीत क्यातमवाड यांनी अ‍ॅड. शहाजी घाटोळ पाटील यांच्यामार्फत खंडपीठात आव्हान दिले आहे.

अशा आहे प्रमुख मागण्या : निवड यादी नियम व अटी यांचे काटेकोरपणे पालन न करताच बेस्ट ऑफ फाइव्हच्या गुणांच्या आधारावर प्रसिद्ध झाली. जाहिरातीप्रमाणे एकूण सरासरी गुणांच्या आधारे यादी प्रसिद्ध होणे अपेक्षित होते. त्यामुळे बेस्ट ऑफ फाइव्हच्या आधारे केलेली उमेदवारांची निवड रद्द करावी. निवड यादीचे पुनर्मुल्यांकन करुन नव्याने दुरुस्त निवड यादी प्रवर्ग निहाय, सामाजिक व समांतर आरक्षण व 10 वीच्या एकूण सरासरी गुणांच्या आधारावर प्रसिध्द करावी, अशी मागणी याचिकेत केली आहे.