सोयगाव : कोविड लसीकरणाच्या तिसर्‍या टप्प्याला मनुष्यबळाचे ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे. बनोटीला एकच दिवसात केवळ तिघांनाच लसीकरण करण्यात आले.

कोविड लसीकरण आता गाव पातळीवर देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. बुधवारपासून सोयगाव तालुक्यातील जरंडी,बनोटी आणि सावळदबारा या तिनही प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणाचे नियोजन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीनिवास सोनवणे यांनी हाती घेतले. मात्र, आरोग्य कर्मचार्‍यांचे मनुष्यबळ कमी असल्याने शुक्रवारी पहिल्याच दिवशी बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्रात केवळ तिघांना लसीकरण करण्यात आले आहे. मनुष्यबळ नसल्याने तिसर्‍या टप्प्याचे नियोजन मात्र हुकले. त्यामुळे   कोविडच्या मात्रा कालबाह्य होण्याची भीती व्यक्त होत आहे. तीन दिवसांपासून सोयगाव तालुक्यात गावपातळीवर प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लस पोहचली आहे. जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात पहिल्याच दिवशी 50 जणांना लसीकरण करण्यात आले. परंतु, जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रातही आरोग्य कर्मचारी संख्या कमी असल्याने खुद्द तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीनिवास सोनवणे यांना लसीकरण करण्याची जबाबदारी आली होती. बनोटीला तर केवळ तिघांना शुक्रवारी लस देण्यात आली. 

तालुक्यात लसीकरणाची जबाबदारी दोघांवर
सोयगाव तालुक्यात कोविड लसीकरणाची जबाबदारी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. केतन काळे आणि तालुका आरोग्य धिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे यांच्यावर आहे. मात्र आरोग्य कर्मचार्‍यांची संख्या अपुरी असल्याने तिसर्‍या लसीकरण मोहिमेत मोठा गोंधळ उडाला आहे.