पैठण : शहराला वाढीव पाणी पुरवठा योजनेंतर्गत गेल्या तीन वर्षापूर्वी जुन्या भागासाठी पिण्याच्या दोन नवीन जलकुंभ बांधण्यासाठी पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणाच्या निधीतून कोट्यवधी रुपय निधी मंजूर करण्यात आला. 
जलकुंभाच्या कार्यरंभ आदेश 2018-19 मध्ये काढण्यात आले. मात्र गेल्या तीन वर्षापासून जलकुंभांचे काम जागेअभावी रखडले असून नागरिकांत संताप व्यक्त केला जात होता. मात्र या गंभीर  प्रश्नाकडे राज्याचे रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी लक्ष घालत तत्काळ 4 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यलयात जुन्या तहसीलच्या इमारतीच्या जागा नगरपरिषदेला वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात बैठकीत घेण्यात आला. याच इमारतीची रविवार रोजी दुपारी 1 वाजता  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडून पाहणी करण्यात आली.  यावेळीउपविभागीय पोलीस अधिकारी पैठण-फुलंब्री स्वप्नील मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख भामरे, तहसीलदार चंद्रकांत शेळके, पो.नि. किशोर पवार, सुनील घुनावतसह महसूल विभागाचे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, या दौर्‍यात सुनील चव्हाण यांनी नाथ मंदिराच्या पाठीमागे असलेल्या मोक्ष घाटाची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मोक्ष घाटावर होत असलेल्या वाळू चोरी रोखण्यासाठी  तसेच वाळू चोरांचे मुसक्या आवळण्यासाठी प्रशासनास कडक सूचना केल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा ताफा थेट तालुक्यातील हिरडपुरीकडे रवाना झाला.
जागा हस्तांतरणचा ठराव मंजूर असताना प्रशासन झोपले होते का? : जुन्या शहरातील जलकुंभ उभारण्यासाठी 29 जून 2020 रोजी पैठण आपेगाव विकास प्राधिकरणाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर केला गेला मात्र गेल्या एक वर्षात याबाबत जिल्हा प्रशासनाने जागा हस्तांतरणाबाबत कुठलीच हालचाल का केली नाही? प्रशासन झोपले होते का? असा प्रश्न राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक दत्तात्रय गोर्डे यांनी उपस्थित केला आहे.

जागा हस्तांतरणाचे आदेश काढणार : जागेअभावी रखडल्या जलकुंभाच्या कामाविषयी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना पत्रकारांनी प्रश्‍न केले असता, सोमवारी (दि.14) नगरपरिषदेला जुन्या तहसीलची जागा हस्तांतरण करण्याचे आदेश पत्र काढणार असून पैठण शहरातील बेकायदेशीर अतिक्रमण लवकरच काढण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.