औरंगाबाद : रेल्वेत टीसी, क्रीडा शिक्षक अशा सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुमारे 30 तरुणांकडून 54 लाख रुपये उकळणार्‍या अशोक साहेबराव वैद्य याला आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी पुन्हा त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अंजूम रुहिना यांनी त्याच्या पोलिस कोठडीत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढ केली आहे.

योगेश नामदेव गोरे (33, रा. प्लॉट क्र. 184, पुष्पक गार्डन, चिकलठाणा) हे 18 फेबु्रवारी 2019 रोजी ओळखीच्या दीपक शहाणे (रा. हर्सुल, पिसादेवी रोड) यांच्या जालना रोडवरील टॅक्स कन्सल्टन्सीच्या कार्यालयात कामानिमीत्त गेले होते. तेथे गोरे यांची शहाणे मार्फत वैद्यशी ओळख झाली होती. तेव्हा वैद्यने ‘मी समाज कल्याण विभागात नोकरीला असून, रेल्वे खात्यातील मोठ-मोठे अधिकारी माझ्या ओळखीचे आहेत. मी काही परिचयाच्या लोकांना रेल्वेत तिकिट कलेक्टरची नोकरी लावून दिली आहे. तुम्हाला ही नोकरी लावून द्यायची असेल तर अकरा लाख रुपये द्यावे लागतील’ अशी बतावणी केली होती. त्यावरुन वैद्यने गोरे यांच्या ओळखीचे अक्षय गायके यालाही नोकरी लावण्यासाठी गोरे प्रमाणेच पैशाची मागणी केली होती. मात्र, नोकरी न लागल्याने गोरे यांनी तक्रार दिल्यावरुन आर्थिक गुन्हे शाखेने तपास करत जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यावरुन वैद्यला अटक करण्यात आली होती.

प्रकरणाच्या तपासादरम्यान आर्थिक गुन्हे शाखेने पुरावे गोळा केले आहेत. वैद्यने त्याचा मित्र भगवान वीरसिंग पाटील याच्या नावे सिल्लोड येथे जमीन व औरंगाबादेतील कृष्णपूरवाडी येथे भूखंड खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दिल्लीतील रेल्वे मंत्रालयामध्ये कोणाची भेट करून दिली त्याचे नाव, गाव व पत्ता काय आहे ? संबंधिताचा गुन्ह्याशी काही संबंध आहे का ? बँक खात्यावर मोठ्या प्रमाणात व्यवहार झाला असल्याने त्याचा तपशील जाणून घेण्यासाठी व इतर कोणी आरोपीचा साथीदार आहे का ? आदींची माहिती घेण्यासाठी सरकारी वकील नितीन जाधव यांनी वैद्यला पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने वैद्यला 30 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

तुमचे काम क्रीडा कोट्यातून होईल
वैद्य याने गोरेंना कामासाठी दिल्लीला जावे लागेल असे सांगितले होते. त्यासाठी त्याने गोरे यांच्याकडून 50 हजार रुपये त्याच्या एसबीआयच्या खात्यावर ट्रान्सफर करुन घेतले होते. त्यानंतर गोरे आणि अक्षय गायके रेल्वेने तर वैद्य विमानाने दिल्लीला गेला होता. तेथे गोरे व गायकेला रेल्वे मंत्रालयात नेत रेल्वे मंत्र्याचा स्वीय सहायक असल्याची बतावणी करुन एकाशी भेट घालून दिली होती. त्यावेळी त्यांना तुमच्या नोकरीचे काम क्रिडा कोट्यातून करतो अशी थाप मारली होती.