नायगाव : महसूल विभागामार्फत अद्याप वाळू लिलावाची प्रक्रिया झाली नसली तरी चोरट्या पध्दतीने चढ्या भावात रेतीची विक्री सुरू असून  नायगाव तालुक्यात चोरट्या मार्गाने अवैधरित्या रेतीची वाहतूक करून शासनाला लाखोंचा चुना रेती चोरट्यांकडून लावला जात आहे.नायगाव तहसील प्रशासनाचा व 
महसूल प्रशासनाच्या आनागोंदी कारभारामुळे तालुक्यात रात्री बे रात्री अवैधरित्या रेतीची वाहतूक चोरट्या मार्गाने होते. परंतू महसूल प्रशासनाने याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्यामुळेचं अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक करणार्‍याची हिम्मत वाढली आहे. संबंधित पोलिसाच्या नजरा चुकवून रेतीची वाहतूक करण्याचा प्रयत्न करीत आहे. कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी चोख कामगिरी बजावत असून अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारा टिप्पर बरबडा बिटचे जेमादार नागोराव पोले व पोलीस नाईक भार्गव सुवर्णकार यांनी पकडून ठाण्यात जप्त करून गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 22 ऑक्टोबर रोजी बरबडा बिटचे जेमादार पोले व पोलीस नाईक भार्गव सुवर्णकार यांना गोपनीय माहिती मिळाली होती. अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारा व रेतीने भरलेला टिप्पर कुंटूर हद्दीत जात असताना कुंटूर ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली  कहाळा  ते कोलंबी कडे जाणार्‍या रोडवर सोमठाणा गावाजवळ एम एच 24 जे 6168 या क्रमांकाचे टिप्परची पाहणी केली. काळी रेती विना परवाना बेकायदेशीररित्या तीन ब्रास काळी रेती ज्याची किंमत 12 हजार 600 रुपये तर चार लक्ष रुपये किमतीचे टिप्पर बिना रॉयल्टी न भरता चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करीत असताना मिळून आले. तलाठी सुनील रामचंद्र हसनपल्ले  यांच्या फिर्यादीवरून  व कुंटूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली रेती माफिया विरोधात कुंटूर ठाण्यात गुन्हा दाखल करून एकास अटक करण्यात आले आहे. अधिक तपास सपोनि. महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली बरबडा दुरक्षत्राचे पोहेकॉ. पोले हे करीत आहेत. कुंटूर पोलिसांच्या धाडसी कारवाईने त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.