औरंगाबाद : शहरातील गुंठेवारी नियमितीकरणासाठी सामान्य नागरिकांना द्याव्या लागणार्‍या आर्थिक शुल्कातील निम्मा खर्च राज्य सरकारने द्यावा, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी मंगळवारी दि.26 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेत केली. गुंठेवारी भागाला स्लम पट्टा म्हणून घोषित करण्याचीही मागणी त्यांनी केली. या प्रमुख मागण्यांसाठी दिवाळीनंतर पालिका मुख्यालयावर भाजपकडून मोर्चा काढला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
  औरंगाबाद शहरातील गुंठेवारी भागातील मालमत्ता नियमीत करण्याच्या मुद्यावरुन शहरात सध्या नागरिकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. पालिकेने रेडिरेकनर दराच्या पन्नास टक्के शुल्क आकारुन गुंठेवारी भागातील निवासी मालमत्ता नियमित करण्याचे जाहीर केले आहे. तर व्यावसायिक मालमत्तांकडून रेडिरेकनरचा संपूर्ण दर वसूल केला जात आहे. तसेच 31 ऑक्टोबरपर्यंत जे मालमत्ताधारक आपली मालमत्ता नियमित करणार नाहीत त्यांच्या मालमत्तांवर कारवाई करण्याचा इशारा देखील पालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिला आहे. व्यावसायिक मालमत्तांपासून कारवाई सुरु करण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. तथापि, पांडेय यांच्या या निर्णयाला पालकमंत्री सुभाष देसाई यांनी तुर्तास स्थगिती दिली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संजय केनेकर यांनी पत्रकार परिषद घेवून मंगळवारी भाजपची भूमिका मांडली. ते म्हणाले की, पालकमंत्र्यांनी पालिका प्रशासकांच्या कारवाईला तुर्त स्थगिती देवून नागरिकांच्या डोक्यावर टांगती तलवार कायम ठेवली आहे. तुर्त स्थगिती म्हणजे पुन्हा कारवाई केली जाईल असेच पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकारामुळे नागरिक चिंतेत आहेत. या पत्रपरिषदेला माजी महापौर भगवान घडमोडे, माजी नगरसेवक नितीन चित्ते, शिवाजी दांडगे, राज वानखेडे व अन्य पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

निम्मा दर असेल 120 रुपये प्रती चौरस मीटर : पालिकेच्या सर्वसाधारण सभेने 2005 मध्ये गुंठेवारीतील मालमत्ता नियमित करण्याचा दर 240 रुपये प्रती चौरस मीटर असा ठरवला होता. त्याच्या निम्मे म्हणजे 120 रुपये प्रती चौरस मीटर असा दर आकारुन पालिकेने गुंठेवारी भागातील मालमत्ता नियमित केल्या पाहीजेत, असेही केणेकर म्हणाले. पालिका हा दर आकारणार नसेल तर गुंठेवारीच्या नियमितीकरणाचा अर्धा खर्च राज्य सरकारने करावा, गुंठेवारी भागाला स्लम घोषित करावा, अशी भाजपची मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रशासक, पालकमंत्र्यांविरोधात देणार सीपींकडे तक्रार : कोरोनाकाळात नागरिकांची आर्थिक ओढाताण झाली आहे. त्यातच पालिका रेडिरेकनर दरानुसार पैसे भरुन मालमत्ता नियमित करुन घेण्याचे सांगत आहे, त्यामुळे आर्थिक समस्या अधिकच बिकट होणार आहे. यातून आत्महत्तेसारखे प्रकार देखील घडू शकतील. या सर्व बाबी लक्षात घेता पालकमंत्री व पालिकेचे प्रशासक यांच्या विरोधात भाजप पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल करेल. दहशत निर्माण करणे, दमदाटी करणे, आत्महत्तेस प्रवृत्त करणे यासाठी गुन्हा दाखल करा, अशी विनंती पोलीस आयुक्तांकडे करणार असल्याचे केणेकर यांनी नमूद केले. गुंठेवारीतील व्यावसायिकांना शिवसेनेचे स्थानिक नेते फोन करुन आपल्यात मिटवून घेऊ, असे सांगत आहेत, यामागे त्यांची भूमिका नेमकी काय आहे, असा प्रश्न केणेकरांनी उपस्थित केला.