औरंगाबाद : महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात काही महिन्यांपूर्वीच समृद्धी वाघिणीने पाच मादी बछड्यांना जन्म दिला आहे. या पबछड्यांचे नामकरण मंगळवारी दि.21 सप्टेंबर रोजी खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते चिट्ठी काढून करण्यात आले. त्यानुसार या बछड्यांचे 
जिजाई, प्रतिभा, वैशाली, रंजना व रोहिणी असे नामकरण करण्यात आले आहे. 
पालिका प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच प्राणिसंग्रहालयातील समृद्धीच्या पाच मादी बछड्यांचे नाव सुचविण्यासाठी नागरिकांना आवाहन केले होते.  याला प्रतिसाद देऊन किमान 200 नागरिकांकडून नावे सुचविण्यात आली होती. त्यानुसार खास. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते मंगळवारी नामकरणाची सोडत पार पडली. या सोडती पहिल्या बछड्याचे जिजाई असे नामकरण करर्णयात आले. हे नाव रामदास बोराडे  यांनी सूचवले आहे. याप्रमाणे प्रतिभा - सूचक विठ्ठलराव देवकर, वैशाली - सूचक अथर्व चाबुकस्वार, रंजना- सूचक कुसुम दिवाकर, रोहिणी - सूचक पूर्वा पाटील असे नामकरण करण्यात आले आहे. याप्रसंगी खा. सुळे यांनी नामकरण झालेले बछडे व वाघांची पाहणी केली. यावेळी वाघांचे केयर टेकर मोहम्मद जिया व एसबीआय बँक यांनी वाघ दत्तक घेतल्याबद्दल पवार यांचा सत्कार सुळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सुळे यांनी समृद्धी वाघिणीच्या बछड्यानां नाव देण्याची अतिशय गोड संधी दिल्याबद्दल पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांचे आभार देखील व्यक्त केले. वाघ हा माझा आवडता प्राणी असून मी दरवर्षी वाघ बघण्यास ताडोबाला जात असते. मात्र आज जी गोड संधी मला मिळाली ही आयुष्यात एकदाच मिळते. या कार्यक्रमाची मला सदैव आठवण राहतील, असा उल्लेख त्यांनी केला. याप्रसंगी आयुक्‍त पांडेय यांच्यासह पोलीस अधीक्षक(लोहमार्ग) मोक्षदा पाटील, अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाने, शहर अभियंता सखाराम पानझडे, उपायुक्‍त सौरभ जोशी, प्रभारी प्राणिसंग्रहालय संचालक डॉ. शेख शाहेद, सेवानिवृत्त संचालक डॉ.बी.एस. नाईकवाडे, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. नितिसिंह चव्हाण, एसबीआय उपप्रबंधक दत्ता प्रसाद पवार आदींची उपस्थिती होती.

आयुक्‍तांच्या कामाचे कौतुक : ज्या पद्ध्तीने आणि गतीने पांडेय औरंगाबाद शहराचा चेहरा मोहरा बदलत आहे आणि विकासकामे पूर्ण करत आहे, त्याबद्दल त्यांच्या कामांचे कौतुक करते. ते अतिशय चांगले काम करत आहे, असे म्हणत खा. सुप्रिया सुळे यांनी आयुक्‍त पांडेय यांच्या कामाचे कौतुक केले.