औरंगाबाद : समाजातील तळागाळातील महिलांना आर्थिक उभारी देत त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आदर्श महिला नागरी सहकारी बँकेच्या माध्यमातून सतत प्रयत्न होत असतो. आजपर्यंत हजारो महिलांनी बँकेतर्फे कर्ज सहाय्य घेत विविध व्यवसाय, गृहउद्योग स्थापन केले असून भविष्यातदेखील महिलांना आर्थिक स्वयंपूर्ण बनविण्यासाठी आदर्श महिला नागरी सहकारी बँक कटिबद्ध असल्याची ग्वाही बँकेच्या अध्यक्षा वैशाली दौलनपुरे यांनी दिली.
आदर्श उद्योग समूहातर्फे सुरु असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त सोमवार, 11 रोजी अध्यक्षा वैशाली दौलनपुरे यांच्या हस्ते मातेची आरती करण्यात आली. यावेळी अध्यक्षांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कारही करण्यात आला. यांनतर औपचारिक चर्चेत त्या बोलत होत्या. अध्यक्षा म्हणाल्या, आदर्श उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष सहकाररत्न अंबादासराव मानकापे पाटील यांच्या संकल्पनेने विविध योजना राबवून ग्राहकांना सहकार्य केले जात आहे. विशेषतः महिलांसाठी छोटेखानी कर्जपुरवठा करून त्यांच्या कुटुंबाला आर्थिक स्वयंपूर्ण करण्यात आदर्श महिला बँक खारीचा वाटा उचलत आहे. आजपर्यंत हजारो महिलांना बचतगटमार्फत गृहउद्योग सुरु करण्यासाठी सहकार्य करण्यात आले आहे. यामुळे महिला आर्थिक स्वयंपूर्ण होत असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी हरीश दौलनपुरे, आदर्श गावकरीचे सरव्यवस्थापक उदयकुमार कुलकर्णी यांच्यासह आदर्श संस्थेतील कर्मचार्‍यांची उपस्थिती होती.