औरंगाबाद : केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांच्या विरोधात दिल्लीकडे कूच करणार्‍या शेतकरी मोर्चावर केंद्र सरकारकडून अमानुष दडपशाही करण्यात येत आहे. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने दिल्लीकडे निघालेल्या देशभरातील शेतकर्‍यांना विविध राज्यांच्या सीमांवर अडवित आहे. अनेक शेतकरी नेत्यांना स्थानबद्ध केले आहे. किसान सभेच्या केंद्रीय नेत्यांना अटक केले जात आहे. केंद्र सरकारच्या या दडपशाहीचा महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या वतीने किसान सभेने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी माहिती दिली. सरकारच्या या धोरणाचा किसान सभेतर्फे डॉ. अशोक ढवळे, जे.पी.गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख, डॉ.अजित नवले यांनी निषध व्यक्त केला आहे.

केंद्र सरकारचे चुकीचे धोरण
केंद्र सरकार एकीकडे सातत्याने शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या बाता मारत आहे. दुसरीकडे मात्र बेसुमार शेतीमाल आयात करून व भारतीय शेतीमालावर निर्यातबंदी लादून शेतकर्‍यांचे उत्पन्न आणखी कमी करणारी धोरणे राबवत आहे. आता शेतकर्‍यांवर दडपशाही करून हा असंतोष संपविता येणार नाही. शेतकर्‍यांशी चर्चा करून व त्यांच्या मागण्या मान्य करूनच यावर मार्ग काढता येईल. केंद्र सरकारने ही बाब लक्षात घ्यावी.
- डॉ. अजित नवले