औरंगाबाद (ऋषिकेश श्रीखंडे) : दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आता गुणांवर अकरावी वर्गात प्रवेश देण्यात येत आहे. सध्या अकरावी वर्गाची प्रवेश प्रक्रिया कासव गतीने सुरू आहे. या प्रवेश प्रक्रियेला कोरोनाचा जबरदस्त फटका बसला आहे. कारण, कोरोनाच्या धास्तीपोटी मराठवाड्यातील ज्या संख्येने विद्यार्थी औरंगाबादेतील महाविद्यालयात प्रवेश घेत होते, त्यात मोठी घट पहायला मिळते आहे. मराठवाड्यातील तब्बल 40 टक्के विद्यार्थ्यांनी औरंगाबादेतील महाविद्यालयांकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. 
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसर्‍या लाटेची धास्ती लोकांमध्ये कायम आहे. तज्ज्ञांकडून तिसर्‍या लाटेचा इशारा देण्यात आल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. या भीतीमुळे लोक आपल्या मुलांना शिक्षणासाठी बाहेर गावी पाठवत नाहीये. याचे ताजे उदाहरण औरंगाबादेत पहायला मिळत आहे. कारण कोरोनामुळे मराठवाड्यातील 40 टक्के विद्यार्थी औरंगाबादेत प्रवेशासाठी आलेले नाही. औरंगाबदच्या कनिष्ठ महाविद्यालयांची शुल्क भरून परत जर लॉकडाऊन लागले तर आपल्या मुलांचे नुकसान होतेच होते अन् पैसा देखील वाया जातो. ही पालकांमध्ये नवी धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे,  मराठवाड्यातील 40 टक्के विद्यार्थ्यांनी औरंगाबादेत प्रवेश घेतले नाही. अनेक कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या प्रतिक्षेत असून रिकामेच आहे. तसेच दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना टिसीसाठी शालेय प्रशासन अडवणूक करत आहे. शाळांचे पूर्ण शुल्क भरले भरण्याची अट प्रशासनाने घातली आहे. त्याआडून विद्यार्थ्यांच्या टिसी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. याचा देखील फटका कनिष्ठ महाविद्यालयांना बसला आहे. या दोन्ही कारणामुळे औरंगाबादेतील बहुतांश कनिष्ठ महाविद्यालये 
रिकामीच आहेत.

प्रवेश प्रक्रिया थंडावली : आमदार सतिश चव्हाण यांनी औरंगाबादच्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाइन प्रवेश प्रक्रिया करून आणली. मात्र याचा म्हणावा तसा लाभ मिळालेला नाही. कारण शहरातील महाविद्यालये रिकामीच आहे. विद्यार्थी प्रवेशासाठी येत नाहीये. प्रवेश प्रक्रिया थंडावली आहे.
एम.एम. मुरंबीकर,उपप्रचार्य, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय.

कनिष्ट महाविद्यालये रिकामीच :  अकरावी प्रवेश प्रक्रियेला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. कोरोनामुळे मराठवाड्यातील विद्यार्थी औऱंगाबादेत आलेले नाही. जे 40 टक्के विद्यार्थी शहरात शिक्षणासाठी येतात. ते कोरोनाच्या धास्तीमुळे शहरात दाखल झाले नाही. यामुळे शहरातील बरेचसे कनिष्ठ महाविद्यालय रिकामे आहे.
आर.बी. गरूड, प्राचार्य, देवगिरी कनिष्ठ महाविद्यालय.