औरंगाबाद : मागील काही दिवसांपासून भानुदासनगर येथील महादेव मंदिरातून ड्रेनेजचे पाणी वाहत आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने वारंवार समस्या मांडूनही अद्याप कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथील नागरिकांनी बुधवारी दि.9 शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्याकडे तक्रार करत त्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली.
भानुदासनगरात 40 वर्षे जुने महादेवाचे मंदिर आहे. मागील काही दिवसांपासून ड्रेनेजमध्ये चोकअपची समस्या निर्माण झाल्याने ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्‍त पाणी महादेव मंदिरातच जात आहे. चार दिवसांपूर्वी रात्री झालेल्या पावसात महादेव मंदिराचा मूर्तीसह पूर्ण पायथळाच ड्रेनेजच्या पाण्यात बुडाला होता. ड्रेनेजची समस्या सोडवण्यासाठी येथील नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे तक्रार केली. मात्र अद्यापही ही समस्या सोडवण्यात आलेली नाही. शिवाय ड्रेनेजच्या समस्येमुळे या परिसरातील नळांनाही दूषित पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्‍त केला जात आहे. पालिकेने कार्यवाही करण्याकडे दुर्लक्ष केल्याने बुधवारी येथील नागरिकांच्या शिष्टमंडळाने शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची भेट घेतली. या प्रकरणात लक्ष घालून पालिकेला उचित कार्यवाही करण्यास भाग पाडून समस्या सोडवावी, अशी मागणी नागरिकांनी केली. यावेळी माणिकराव जोरले, सोमनाथ देवकाते, गणेश मोगल, मुंकूद विभुते, कुणाल त्रिभुवन, नारायण जाधव आदींची उपस्थिती होती.