औरंगाबाद : शहराच्या विकासात भर टाकणारी विविध विकासकामे महापालिकेने हाती घेतली आहे. यांचा प्रकल्प विकास आराखडाही नुकताच मुख्यमंत्र्यांकडे सादर केलेला आहे. या विविध विकास प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेऊन पुढील कार्यवाहीस गती देण्याचे आदेश पालिका प्रशासक तथा आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी दि.21 सप्टेंबर रोजी दिले. दिलेल्या कालावधीत प्रस्तावित कामे पूर्ण करा, अन्यथा संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
मंगळवारी पालिका मुख्यालयात आयुक्‍त पांडेय यांनी आपल्या दालनात पालिका अधिकार्‍यांची विविध विकासकामांसंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीत पालिकेच्या नविन मुख्य प्रशासकीय इमारतीच्या जागेबाबत प्राथमिक चर्चा झाली. तसेच हर्सूल घनकचरा प्रक्रिया केंद्राच्या जागेचा व कामाच्या प्रगतीचा आढावा घेत पुढील कार्यवाहीस गती देण्याचे आयुक्‍तांनी आदेशित केले. पालिकेकडून शहरात आणखी पाच पेट्रोल पंप व ई-चार्जीग स्टेशन उभारले जाणार आहे. या कामास लगेच गती द्यावी. मुख्यमंत्र्यांकडे सादर केलेल्या 317 कोटी रूपयांच्या रस्त्याचा तसेच सातारा देवळाई येथील भूमिगत गटार योजनेचा डीपीआर व शहरातील उर्वरित भुमिगत गटार, 252 कोटी रुपये रस्त्याच्या कामाच्या प्रगतीचाही आढावा आयुक्‍तांनी घेतला. शहराच्या विविध चौकातील वाहतूक बेटे विकसित करणे व एनजीओला दत्तक देणे, उड्डाण पूलाखालील जागा विकसित करणे आदी विकासकामांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. या विविध कामांतील अडचणी सोडवून कार्यवाहीस गती द्यावी, वेळकाढूपणा व दिरंगाई केल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही आयुक्‍त पांडेय यांनी दिला. बैठकीला अतिरिक्त आयुक्त बी.बी.नेमाने, शहर अभियंता एस.डी. पानझडे, सहायक संचालक नगररचना जयंत खरवडकर, घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे, प्रभारी मुख्य लेखाधिकारी संजय पवार, उपायुक्त अपर्णा थिटे आदींची उपस्थिती होती.

100 स्वच्छतागृहांच्या कामांना डेडलाइन : शहरात विविध ठिकाणी महिला व पुरूषांसाठी एकूण 100 स्वच्छतागृहे उभारली जाणार आहेत. ही कामे 5 आक्टोबरपर्यत पूर्ण करा, असे आदेशित करत या कामास आयुक्‍तांनी डेडलाइन दिली. पैठण गेट येथील बहुमजली पार्किंग उभारण्यासाठी पीएमसी नियुक्त करण्याचे आदेश आयुक्‍तांनी अधिकार्‍यांना दिले.