सहकाराचे सारथ्य  : पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये महिलांना स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. मुख्य म्हणजे महिलांना व्यवस्थापनात, अर्थकारणात मानाचे स्थान दिले पाहिजे, हा विचार मुळातच विधायक; पण हा विचार अंगिकारणे, अंमलात आणणे ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. त्यासाठी विशाल दृष्टीकोन हवा; मनात महिलांच्या उद्धाराची तळमळ हवी. दादासाहेबांच्या मनी तशी ती तळमळ आहे म्हणूनच त्यांनी महिलांच्या आर्थिक उद्धारासाठी, त्यांना समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी  महिला बचतगटांना साह्यभूत ठरेल, अशी ‘औरंगाबाद जिल्हा आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्था’ स्थापन केली. महिलांच्या कर्तबगारीला न्याय दिला; प्रेरणा दिली. समाजातील उपेक्षित घटक, महिला, सुशिक्षित तरुण स्वावलंबी कसे होतील. निर्भयपणे स्वाभिमानाने कसे जगतील, याचीच काळजी दादासाहेबांनी सतत घेतली. महिलांसाठी बँक, पतसंस्था स्थापन करतानाच बेरोजगारीला आळा घालण्यासाठी आदर्श नागरी सहकारी पतसंस्था आणि इतर काही संस्थांचा संसार थाटला; स्वतःच्या झुंजार नेतृत्वाखाली हा संसार वाढविला. ‘आदर्श समूह’ बघता-बघता नावारुपास आणला; पण दादासाहेबांनी त्याचे श्रेय कधीच घेतल्याचे दिसत नाही. जे केले, ते लोकांनी! लोकांच्या सहकार्यामुळेच, त्यांच्या सहयोगामुळेच मी सहकारात काही ‘आदर्श’ कार्य करू शकलो; करीत राहीन, अशी नम्र भावना ठेवूनच दादासाहेब वागले; वागत आहेत. एक-एक करून मनातील स्वप्न साकारत आहेत. कुठल्याही परिस्थितीत विचलित न होता सहकाराचे सारथ्य करीत आहेत. 

आरोग्य सेवेचे पुण्यकार्य  : दादासाहेबांनी आतार्पंत अनेक विधायक स्वप्नं पाहिली. ती सत्यात उतरवली. मुख्य म्हणजे ‘आदर्श सहकार रुग्णालय व संशोधन केंद्र मर्या., औरंगाबाद’ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवून महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात एक नवा ‘आदर्श’ प्रस्थापित केला. आपण जाणून आहोत की, सहकारी संस्था स्थापणे ही सहज-सोपी गोष्ट नाही. ते जिकीरीचेच काम; पण त्यापेक्षा अधिक जिकीरीचे काम असते ते स्थापन केलेली संस्था उत्तम प्रकारे चालविण्याचे! दादासाहेबांनी आजतागायत ज्या-ज्या संस्था स्थापन केल्या, त्या-त्या संस्था उत्तमरित्या चालविल्या. अर्थातच सहकारी रुग्णालयाच्या माध्यमातून नावाप्रमाणेच ‘आदर्श’ असे कार्य करण्यासाठी; उपेक्षित घटकांना, गोरगरिबांना मोफत नाही; पण अगदीच माफक दरात आधुनिक आरोग्य सेवा देण्यासाठी दादासाहेब आणि त्यांचे सहकारी प्रयत्नशील आहेत; आरोग्य सेवा हीच ईश्‍वरी सेवा समजून समाजातील रंजल्या-गांजल्यांना आरोग्य सेवा देत आहेत. हे काम भव्य-दिव्य, विधायक आणि पुण्याचेच! त्यामुळेच या पुण्य कार्याचा वाटा समाजातील संवेदनशील दानशूरांनी, समूह, संस्था-संघटनांनी उचलला पाहिजे; संस्थेच्या भागभांडवल उभारणीच्या कार्यास सहकार्य केले पाहिजे; सर्वसंबंधितांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला पाहिजे. शेवटी कुठलेही सरकार जनतेसाठी सर्वकाही करू शकत नसते. ते शक्यही नाही. तेव्हा किमान विधायक काही काम करण्यासाठी समाजाने पुढे आले पाहिजे. ‘एकमेका साह्य करू, अवघे धरु सुपंथ’ या ब्रिदाला जागून एकत्र आले पाहिजे. सहकाराचा गजर करीत स्वहितासह समाजहितासाठी झोकून दिले पाहिजे; दादासाहेबांनी पुन्हा एकदा तेच केले आहे; सहकार तत्त्वावरील सर्व सोयींनीयुक्त, सुसज्ज असे सहकारी रुग्णालय उभारण्याचे शिवधनुष्य हाती उचलले आहे. तेव्हा यांच्या या कार्यास सर्वांनीच साथ दिली पाहिजे. पुण्याचे वाटेकरी झाले पाहिजे.  

चैतन्याचा झरा :   दादासाहेब म्हणजे चैतन्याचाच झरा. त्यांच्या अथक परिश्रमाकडे पाहिले म्हणजे मला, सुप्रसिद्ध चित्रकार पाब्लो पिकासो यांच्या एका प्रसिद्ध विधानाचे स्मरण होते. पिकासो म्हणाले होते की, ‘मला थकवा येत नाही, कारण मी काम करत असताना चपलांप्रमाणेच माझं शरीरही बाहेर काढून ठेवतो!’ हे विधान मला दादासाहेबांकडे पाहिले की, पुनःपुन्हा आठवते. कारण गेल्या तीन दशकाहून अधिक काळ मी त्यांना जवळून पाहतोय. अनुभवतोय. ते सतत कामाच्या रगाड्यात व्यस्त व व्यग्र असतात. दिवसाचे चोवीस तासही अपुरे वाटावेत आणि सलग चार-सहा तासांची झोप म्हणजे मौज वाटावी, इतका त्यांचा कामाचा व्याप असतो. सततची लोकांची गर्दी, कार्यक्रमाची आखणी व कृती, आवश्यक ते वाचन, अफाट व्यासंग, सर्वसामान्यांच्या व्यक्तिगत गार्‍हाण्यांपासून संस्थात्मक अडचणीतून मार्ग काढण्याची धडपड हे सारे दादासाहेबांचे वर्षानुवर्षे सुरूच आहे.  शेवटी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याशिवाय यशाचे तोंड कधीच कोणाला बघता येत नसते. जगत्गुरु संत तुकाराम महाराज आपल्या एका अभंगातून तेच तर सांगितात-
ओले मूळ भेदी खडकाचे अंगे, 
अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी ।
नव्हे ऐसे काही अवघड  
नाही कईवाड तोंचि करि॥
म्हणजे ओले मूळ खडकाचे अंग भेदू शकते. अभ्यास, सराव, 
चिकाटीमुळेच माणसाला कार्यसिद्धी प्राप्त होते. जोपर्यंत आपण एखादे कार्य करण्याचा निश्‍चय करीत नाही, अंगी चिकाटी बाळगत नाही, तोपर्यंतच कार्य अवघड वाटते. मात्र एकदा अभ्यास, चिकाटीचा निश्‍चय केला की, काहीही अवघड, अशक्य नसते. अभ्यास, सराव, चिकाटीच्या जोरावर अशक्य ते शक्य करणार्‍यांपैकीच दादासाहेब एक आहेत.

मान-सन्मानांचे मानकरी : दादासाहेबांच्या अतुलनीय कार्याची दखल आतापर्यंत अनेकांनी घेतली. त्यांचा अनेक संस्थांनी मान-सन्मान केला. त्यांना वेळोवेळी गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, दादासाहेबांना 17 सप्टेंबर 2003 रोजी (मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनी) ‘मराठवाडा रत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारांसाठी ‘महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी समिती’ आणि ‘स्वामी रामानंद तीर्थ सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जातो. मराठवाडा विभागात असे उल्लेखनीय कार्य केल्याने, भरीव योगदान दिल्याने या मानाच्या पुरस्कारासाठी दादासाहेबांची निवड झाली. विशेष असे की, स्वामी रामानंद तीर्थ या थोर महात्म्याच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचा हा गौरव झाला. एवढेच नव्हे तर सहकार शताब्दी वर्षाचे औचित्य साधून दादासाहेबांना ‘सहकार रत्न’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. लोकनेते श्री. शरद पवार यांच्या हस्तेही दादासाहेबांचा सन्मान, सत्कार झाला. मान-सन्मानाचे असे अनेक प्रसंग दादासाहेबांच्या वाटणीला येत असले तरीही त्याचा गर्व त्यांनी कधीही बाळगलेला नाही. जे केले ते कर्तव्य भावनेने, हीच त्यांची मनोभावना राहिली. अशा या मोठ्या मनाच्या, लढवय्या दादासाहेबांच्या कर्तबगारीला प्रणाम! त्यांच्या हातून उत्तरोत्तर असेच विधायक, विकासात्मक लोकोपयोगी कार्य घडत राहो, त्यासाठी त्यांना उदंड आयुष्य लाभो, हीच आजच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने ईश्‍वर चरणी प्रार्थना!

ध्यास आदर्शाचा : दादासाहेब सामान्य शेतकरी कुटुंबातील; पण ते आपल्या कर्तबगारीने असामान्य ठरले. आपले ध्येय निश्‍चित करून ते पूर्ण करण्याच्या ध्यास घेणारा, त्यासाठीच शिस्तबद्ध आणि प्रामाणिक प्रयत्न करणारा सर्वसामान्य माणूसही असामान्य, अतुलनीय, आदरणीय ठरू शकतो. हाच धडा दादासाहेबांनी आपल्या जीवनकार्यातून घालून दिला. विविध प्रकारच्या अनुभवांचे संचित, स्मरणशक्ती, नेतृत्वगुण, संघटनकौशल्य, आकलनशक्ती, निर्णयक्षमता, शेतकरी व ग्रामीण समाजजीवनाची अचूक आणि परिपूर्ण जाणीव आदी गुणांच्या आधारे दादासाहेब खर्‍या अर्थाने ‘कर्मयोगी’ ठरले. ‘केल्याने होते रे आधि केलेचि पाहिजे’ हाच सकारात्मक भाव मनी बाळगून दादासाहेबांनी सहकार क्षेत्रात अतुलनीय असे कार्य केले; करत आहेत. सहकार खात्यात कार्यरत असतानाच दादासाहेबांनी कर्मचारी बांधवांसाठी सहकारी गृहनिर्माण सोसायट्या स्थापन्यामध्ये पुढाकार घेतला. दरम्यान महिलांसाठी स्वतंत्र अशी एक बँक स्थापन करावी, असे एक स्वप्न त्यांनी पाहिले. नव्हे तेे स्वप्न साकारलेही. दादासाहेब तेवढ्यावर थांबले नाहीत, तर या बँकेचा कारभार नावाप्रमाणेच ‘आदर्श’ कसा राहील, यासाठी ते सतत दक्ष राहिले; आग्रही राहिले. दादासाहेबांच्या आग्रहामुळे, मार्गदर्शनामुळेच आदर्श महिला बँक नावलौकिकास पात्र ठरली. या बँकेमुळेच अनेक महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहाणे सहज शक्य झाले.  

संपादकाच्या भूमिकेत  : दादासाहेब म्हणजे अखंड तेवणारा नंदादीपच जणू. सतत तेवत राहायचे; लोकांचे जीवन उजळायचे! सकळांना शहाणे करायचे. ‘आदर्श गावकरी’ या दैनिकाचे प्रकाशन सुरु करून दादासाहेबांनी पुन्हा त्याचाच तर प्रत्यय दिला. ‘आदर्श गावकरी’ या दैनिकाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन व्हावे, जनतेचे, त्यातही ग्रामीण जनतेचे प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न करावा, त्यांच्या मनात आशावाद निर्माण करावा, त्यांना जगण्याची  दिशा मिळावी, या हेतूने दादासाहेबांनी ‘आदर्श गावकरी’ या दैनिकाचा श्रीगणेशा केला. वर्तमानपत्राचे महत्त्व ओळखले. खरे म्हणजे आजच्या स्पर्धेच्या युगात वृत्तपत्र चालवणे हे मोठे जिकीरीचे काम. त्यातच मागील दीड वर्षात ‘कोरोना’च्या महासंकटाने कहर केला. त्यामुळे वृत्तपत्राचा संसार चालविणे, अधिकचे कठीण झाले. मात्र, एक संस्थापक संपादक या नात्याने ‘कोरोना’च्या महासंकटावरही मात करण्याचा दादासाहेबांचा प्रयत्न राहिला. धाडस हेच तर दादासाहेबांचे दुसरे नाव आहे. दादासाहेब धाडसातूनच अथकपणे विधायक असे नव्याने काहीतरी करीत असतात. त्यांच्या शब्दकोषात ‘थकवा’ हा जणू शब्दच नाही.
 उमाकांत टिळक