भोकरदन : येथील ग्रामीण रुग्णालयाचे  सुसज्ज अशा 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयास (ट्रामा सेंटर) मंजुरी मिळून तब्बल दोन वर्षानंतर 22 कोटी 52 लाखांचा निधी मंजूर झाला असून प्रत्यक्ष काम सुरू होण्याआधीच उपजिल्हा रुग्णालयाच्या मंजुरी श्रेयासाठी भाजपचे आ. संतोष दानवे व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ. चंद्रकांत दानवे या दोघांनीही दावा केल्याने श्रेयवादाची लढाई होताना बघायला मिळत आहे.
 दरम्यान भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात अंतर व बाह्य रुग्णांची संख्या जालना जिल्ह्यात सर्वाधिक असल्याने या ठिकाणी उपजिल्हा रूग्णालयाची मागणी बर्‍याच दिवसांपासून प्रलंबित होती. जुलै 2019 मध्ये या मागणीला मंजुरी आदेशही मिळाले होते. मात्र, निधी अभावी सदर काम रखडले होते. 
याबाबत भाजपचे विद्यमान आ. संतोष दानवे यांनी 
म्हटले आहे की, उपजिल्हा रुग्णालय चा प्रस्ताव मंजूरी साठी वेळोवेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित आरोग्य मंत्र्याकडे पाठपुरावा केल्याने या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून भोकरदन येथे पन्नास खाटांच्या ट्रामा सेंटरला मंजुरी आदेश व निधी मिळाला आहे. तर राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे सतत पाठपुरावा करून तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून मंजुरी मिळवून भोकरदन ग्रामीण रूग्णालयास 22 कोटी 52 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे.त्यामुळे आता उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाला सुरुवात होण्याआधीच या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजप व राष्ट्रवादीकडून होत असल्याने या कामाचे प्रत्यक्षात श्रेय कोणाचे असा सवाल उपस्थित झाला आहे. दरम्यान याबाबत भाजप व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी या श्रेयवादावर सोशल मीडियावर दावे-प्रतिदावे करण्यात येत आहे.