औरंगाबाद : महापालिकेकडून दाखल झालेल्यांपैकी गुंठेवारी नियमितीकरणासाठी आतापर्यंत 588 मालमत्तांच्या संचिकांना मंजूरी देण्यात आली आहे. त्यातून पालिकेच्या तिजोरीत 5 कोटी 30 लाख रूपयांचा महसूल जमा झाला आहे, अशी माहिती सहायक संचालक नगररचना जयंत खरवडकर यांनी दिली.
शहरातील गुंठेवारी वसाहतीमधील मालमत्ता नियमित करण्यासाठी पालिकेने प्रभागनिहाय गुंठेवारी कक्ष स्थापन केले आहेत. त्यासाठी कर्मचारी वर्ग देेखील दिला आहे. तसेच 52 वास्तूविशारदांचे पॅनल तयार केले आहे. या पॅनलकरवी प्रस्ताव दाखल केले जात आहेत. गुंठेवारी कक्ष प्रमुख म्हणून नगररचना विभागाचे उपअभियंता संजय चामले यांची नियुक्ती केलेली आहे. गुंठेवारीतील मालमत्ता नियमित करून घेण्यासाठी नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा पालिका करत आहे. वास्तूविशारद 
यांच्याकडून प्रस्ताव दाखल केले जात आहे. आतापर्यंत 890 संचिका दाखल झाल्या असल्या तरी त्यापैकी 588 संचिकांसाठी चलन भरण्यात आले असून पालिकेच्या बँक खात्यात 5 कोटी 30 लाख रूपये जमा झाले आहेत. त्यामुळे 588 संचिकांना मंजूरी देण्यात आली आहे. आता गुंठेवारी नियमित झालेल्या मालमत्ताधारकांना प्रमाणपत्राचे वाटपही केले जाणार आहे. 

 दोन दिवसांत बँकेत स्वतंत्र खाते : गुंठेवारी नियमितीकरणातून जमा झालेली रक्कम त्याच भागात विकास कामासाठी खर्च केली जाणार आहे. मात्र पालिकेने गुंठेवारीतील रक्कम जमा करण्यासाठी बॅकेत स्वतंत्र खाते अद्याप उघडलेले नाही. ही बाब समोर येताच आगामी दोन दिवसात बँकेत स्वतंत्र खाते उघडले जाणार असल्याचे खरवडकर यांनी सांगितले.