औरंगाबाद : शहरातील वाढत्या कोरोना रूग्णांना योग्य उपचार देण्यासाठी व संसर्गास प्रतिबंध करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी तब्बल 55 कोटींचा खर्च अपेक्षित आहेत. यात अधिकाधिक व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करणे, कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार, त्यांच्या जेवणाची सोय, कोविड केअर सेंटरमधील सुविधा या खर्चांचा समावेश आहे. त्यामुळे अपेक्षित निधीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे.
पुन्हा एकद फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना संसर्ग वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. शहरात एक फेब्रुवारी रोजी फक्त 18 रुग्ण आढळले होते. त्यानंतर अचानक संसर्गाने उसळी घेतली. मार्च महिन्यापासून गतीने रूग्णसंख्या वाढत असून आजघडीला परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. त्यामुळे पालिकेने नव्याने उपाययोजना सुरू केल्या आहेत. मागील महिन्यात केवळ दोन कोविड केअर सेंटर सुरू होते. आता ही संख्या 12 च्या पुढे गेली आहे. नवीन कोविड केअर सेंटर सुरू करताना त्याठिकाणी गाद्या, पलंग, उश्या, लाइट, पंखे अशी व्यवस्था करावी लागते. सोबत रुग्णांना जेवण, नाश्ता, चहा, उपचारासाठी आवश्यक औषधी, त्यासोबत कर्मचारी, डॉक्टर, नर्स अशी यंत्रणा उभी करावी लागते. त्यासाठी मोठा खर्चही येत आहे. आगामी काही महिन्यांसाठी अशा उपाययोजना निरंतर कराव्या लागणार असल्याने पालिकेने जिल्हा प्रशासनाला 55 कोटी रुपयांच्या निधीच्या मागणीचा प्रस्ताव पाठवला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी गुरूवारी दि.18 दिली.

गतवर्षी 45 कोटींचा खर्च :  गतवर्षी देखील याच महिन्यापासून शहरात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला होता. त्यावेळी सुमारे 45 कोटी रुपयांचा खर्च झाला. शासनाकडून पालिकेला आजवर 37.36 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे, तर उर्वरित रक्कम निधी मिळाला नसल्याने अद्याप कंत्राटदारांना देणे बाकी आहे. शासनाने पालिकेला जिल्हा नियोजन समिती, आपत्ती व्यवस्थापनातून आजवर निधी दिला आहे.

साहित्य खरेदी, औषधी, ऑक्सिजन खरेदी : 22 कोटी
वाढीव कोविड केअर सेंटरसाठी : 25 कोटी
कोविड केअर सेंटरच्या लाईटबीलासाठी : 5 कोटी
इतर आवश्यक बाबींसाठी : 2 कोटी