औरंगाबाद :  औरंगाबाद महापालिका वारंवार आवाहन करत असतानाही नागरिक पाणीपट्टी भरत नाहीत. पालिका प्रशासनाकडून पाणीपट्टी थकविणार्‍यांवर कारवाई केली जात नसल्याने मागील काही वर्षांत थकबाकी वाढून ती आजघडीला तब्बल 321 कोटीवर पोहचली आहे. तथापि, यंदाच्या चालू 2020-21 या आर्थिक वर्षांत 61 कोटी रुपयांची डिमांड निश्‍चित केली आहे. यातील केवळ 13 कोटी रुपये मागील सात महिन्यांत वसूल झाले आहेत.
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठीच्या जायकवाडी धरणापासून शहरापर्यंत टाकण्यात आलेल्या दोन्ही जलयोजना आजघडीला कालबाह्य झाल्या आहेत. अशा परिस्थितीतही वाहिन्यांना थिगळं लावून पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेचा पाणीपुरवठा विभाग तारेवरची कसरत करत आहे. धरणात पाणी असतानाही ते आणण्याची पुरेशी यंत्रणा नसल्याने नागरिकांना काही भागात तब्बल पाच दिवसाआड तर काही ठिकाणी सहा-सात दिवसानंतर पाणी मिळते आहे. त्यातही कालबाह्य झालेल्या पाणीपुरवठा योजनेमुळे वारंवार व्यत्यय येतो. अत्यल्प पाणी मिळत असताना तब्बल चार हजारपेक्षा जास्त पाणीपट्टी भरायची कशाला? यास भूमिकेतून नागरिक पालिकेकडे पाणीपट्टी नियमित भरत नाहीत. पाणीपट्टी कमी करण्याची मागणी देखील विविध संघटनांनी लावून धरली आहे. दरम्यान समांतर जलयोजनेची कंत्राटदार औरंगाबाद सिटी वॉटर युटीलीटी कंपनीने पालिकेला शहरातील नळांचे रेकॉर्ड आजपर्यंत दिले नव्हते. त्यामुळे पालिकेच्या पाणीपट्टी वसुलीला मोठा फटका बसला आहे. ज्या नागरिकांनी स्वेच्छेने पाणीपट्टी भरली तेवढीच मागील तीन-चार वर्षांत जमा झाली आहे. यामुळे काही वर्षातील थकबाकीचा आकडा 321 कोटीवर गेला आहे, अशी माहिती स्वतः पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी दिली. पालिकेच्या रेकॉर्डवर फक्त 1 लाख 16 हजार नळजोडण्या आहेत. समांतरची कंपनी गेल्यानंतर यंदा प्रथमच नळांची बिले अंतिम केली असून त्यानुसार वसुलीचे नियोजन आता केले जात असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

जलमीटर सोबतच बेकायदा नळ शोधणार : पालिका प्रशासनाने आता शहरातील नळांना जलमीटर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. हे काम स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत करण्याचे ठरले आहे. त्यासाठी पुण्याच्या ब्लू स्ट्रीम संस्थेमार्फत प्रकल्प अहवाल तयार केला जाणार आहे. जलमीटर बसविण्याचे काम सुरू होताच शहरातील बेकायदा नळांचा शोधही घेतला जाणार आहे, असे आयुक्त पांडेय यांनी स्पष्ट केले.


मनपाच्या नोंदीवरील नळधारक :
•निवासी नळ -                      1,14,629
थकबाकी -                          264,98,92,592
 चालू मागणी -                     49,14,37,782
 एकूण -                              314,13,30,374
•व्यावयासिक नळ -               1923
 थकबाकी -                         56,55,65,599
चालू मागणी -                       11,80,35,955
 एकूण -                        68,36,01,554