औरंगाबाद - राज्याच्या माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी-बारावी पुरवणी परीक्षेस शुक्रवार दि.20 पासून सुरुवात झाली. कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींना अर्धा ते एक तास अगोदर येण्यास सांगितले होते. तसेच परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यापूर्वी विद्यार्थ्यांची थर्मल गणद्वारे तपासणी करुन आत प्रवेश देण्यात आला.

वर्गखोल्यांतही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. दरवर्षी दहावी, बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये, म्हणून जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात येते. यंदा मात्र कोरोना संसर्गामुळे ही परीक्षा उशीराने सुरु झाली. फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणार्‍या नियमित परीक्षांप्रमाणेच या पुरवणी परीक्षेसाठी केली जाते. मात्र कोरोनामुळे यंदाच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत परीक्षार्थीची संख्या कमी होती. काही परीक्षा केंद्रावर पाच ते सहाच विद्यार्थी होते. तर दुपारच्या सत्रात झालेल्या पेपरसाठी काही केंद्रावर एक ते दोनच विद्यार्थी परीक्षेला दिसून आलेे. कोरोनाच्या अनुषंगाने सर्व केंद्रांना देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करत एका बाकावर एक विद्यार्थी आणि एक बाक सोडून विद्यार्थ्यांना बसवण्यात आले होते. या परीक्षेसाठी इयत्ता दहावीचे 6 हजार 623 विद्यार्थी बसले आहेत. तर बारावीचे 6 हजार 777 विद्यार्थी परीक्षेला आहेत.

केंद्रांवर ना ड्रोन ना आरोग्य पथक
शहरात 15 परीक्षा केंद्र असून, 2 हजार 795 विद्यार्थी ही परीक्षा देत आहे. दरम्यान प्रत्येक केंद्रावर आरोग्य पथक असेल, असे शिक्षण विभागाने म्हटले होते. मात्र आरोग्य पथक केंद्रावर फिरकले नाही. तर जिल्हाधिकार्‍यांनी ड्रोन कॅमेर्‍याची नजर राहिल, असे म्हटले होते. मात्र ड्रोन कॅमेरा देखील परीक्षा केंद्रांवर दिसून आला नाही.