औरंगाबाद : राज्य सरकारच्या आदेशानुसार महापालिकेकडून शहरातील विविध वॉर्डातील सिमेंट रस्त्यांचा 317 कोटींचा प्रस्ताव तयार केला जात आहे. त्यासाठी आमदार प्रदीप जैस्वाल यांनी मध्य मतदार संघातील 100 कोटींच्या 34 रस्त्यांची यादी मंगळवारी दि.26 ऑक्टोबर रोजी प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्याकडे सुपुर्द केली. विशेष म्हणजे, या यादीत मागील अनेक वर्षांपासून अंतर्गत राजकारणामुळे दुर्लक्षित असलेल्या हर्सूल ते पिसादेवी या रस्त्याचा समावेश करत जैस्वाल यांनी मध्य मधील हर्सूलकरांच्या नाराजीवर निशाणा साधला आहे. 
मध्यंतरी पाच वर्षे आमदार असताना विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांनी नागरिकांच्या मागणीनंतरही हर्सूल-पिसादेवी रस्त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही.
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी औरंगाबाद शहरातील रस्त्यांसाठी 152 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. या निधीतून विविध वॉर्डातील रस्त्याचे सिमेट कॉक्रीटीकरण करण्यात आले. मात्र काही प्रमुख रस्त्यांची कामे अजूनही बाकी आहेत, त्यासाठी पालिकेकडे निधीही नाही. त्यामुळे आता पुन्हा शहरातील रस्त्यांसाठी निधी दिला जाणार आहे. त्यासाठी पालिका प्रशासकांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासमोर 317 कोटीच्या रस्त्यांचे सादरीकरण केले. मुख्यमंत्र्यांनी रस्त्यांचा प्रस्ताव सादर करण्यापूर्वी आमदारांच्या शिफारसी विचारात घेण्याची सूचना नगरविकास विभागाला केली. 
नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आमदारांच्या शिफारसी घेऊन रस्त्यांची यादी सादर करण्याचे आदेश पालिकेला दिले. त्यानुसार प्रशासक पांडेय यांनी शहरातील आमदारांनी रस्त्यांची यादी देण्याची विनंती केली होती. त्यात आ. प्रदीप जैस्वाल यांनी मध्य विधानसभा मतदार संघातील महत्वाच्या रस्त्यांचे कॉक्रिटीकरण करण्यासाठी शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्यासमवेत रस्त्यांची पाहणी केली. त्यानंतर शंभर कोटीच्या निधीतून होणार्‍या 34 रस्त्यांची यादी मंगळवारी प्रशासक पांडेय यांच्याकडे सादर केली. यावेळी युवासेना कॉलेज कक्षप्रमुख ऋषिकेश जैस्वाल, शहर अभियंता सखाराम पानझडे, अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम, सौरभ जोशी, उपायुक्त अपर्णा थेटे यांची उपस्थिती होती. यावेळी आमदार जैस्वाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री सुभाष देसाई यांची आभार मानले. या यादीत हर्सूल परिसरातील प्रमुख रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. 


आदर्श गावकरीचा सुरूवातीपासून पाठपुरावा : मागील दहा वर्षांपासून हर्सूल ते पिसादेवी रस्त्याचे मजबुतीकरण करण्याकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले. दरम्यान, मागील पाच वर्षांत पालिकेला शासनाकडून जवळपास तिनशे कोटींचा निधी रस्त्यांच्या कामासाठी मिळाला. मात्र अंतर्गत राजकारणामुळे या निधीतील रस्त्यांच्या यादीत या रस्त्याला कायम डावलण्यात आले. मात्र यासाठी वेळोवळी नागरिकांच्या मागणीनुसार आदर्श गावकरीने वृत्त प्रकाशित करत पाठपुरावा केला. अखेर त्याची दखल प्रशासन व आमदारांनी आता घेतली आहे.

सर्वांत खराब रस्ता म्हणून ओळख : हर्सूल ते पिसादेवी या रस्त्यावरून शहरवासीयांसह दहा ते बारा गावांतील ग्रामस्थ रोजचा प्रवास करतात. गत दहा वर्षांत या परिसरात बांधकामे वाढल्याने जड वाहनांनी या रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. आजघडीला शहरातील सर्वात खराब रस्ता म्हणून या रस्त्याची ओळख निर्माण झाली आहे. मागील पाच वर्षांत पालिकेतील सत्ताधारी शिवसेना व भाजपच्या अंतर्गत राजकारणामुळे या रस्त्याच्या कामाला कायम बगल देण्यात आली. त्यामुळे येथील नागरिक संतप्‍त आहेत.