औरंगाबाद : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील अंगणवाड्यासाठी 10 कोटी रुपये निधी मंजूर केले आहे. त्यामध्ये जवळपास 130 नवीन अंगणवाड्या तसेच जुन्या नादुरुस्त अंगणवाड्यांची दुरुस्ती करण्याचे नियोजन जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातिल 2 लाख 35 हजार बालकांना याचा फायदा होणार असल्याचे जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले यांनी सांगितले.
जिल्ह्यामध्ये एकूण 3455 अंगणवाड्या आहेत. यामध्ये 3 महिने ते 6 महिन्याचे 1 लाख 10 हजार बालके व 6 महिने ते 3 वर्षाचे 1 लाख 25 हजार बालक आहेत. जिल्ह्यातील एकूण अंगणवाड्यापैकी 2749 अंगणवाड्याना इमारती आहे तर 706 अंगणवाड्याना इमारत नाही. यामध्ये 294 अंगणवाड्याच्या इमारती भाड्याने घेण्यात आल्या आहे. तर उर्वरित 400पेक्षा जास्त अंगणवाड्या या ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, समाजमंदिर, मंदिर, ओटे आदी ठिकाणी भरवण्यात येतात. जिल्ह्यातील जवळपास चारशे पेक्षा जास्त अंगणवाड्याच्या इमारती या नादुरुस्त स्थितीत आहे. यामुळे प्रत्येक ठिकाणी अंगणवाडीची स्वतंत्र इमारत असावी अशी मागणी अनेक वेळा जिल्हा परिषद सदस्यांनी केली होती. त्यानुषंगाने जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या अंगणवाडयासाठी दहा कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून त्यामध्ये जवळपास 130 नवीन अंगणवाड्या तसेच जुन्या नादुरुस्त अंगणवाड्यांची दुरुस्ती करण्याचे नियोजन विभागामार्गात करण्यात येत आहे.

लवकरच स्वतंत्र इमारती : 
एका अंगणवाडीच्या नवीन इमारतीसाठी साधारणतः 8.50 लाख तर डोंगरी भागातील इमारतीसाठी 9 लाख 35 हजार रुपये मंजूर करण्यात येते. त्यामुळे येणार्‍या काळात लवकरच अंगणवाड्यांच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन बालकासाठी स्वतंत्र इमारत उभी होणार आहे.