औरंगाबाद : मागील सव्वा महिन्यात शहरात तब्बल 1.89 लाख नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 30,847 नागरिकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोनाची दुसरी लाट शहरात जोर धरत असताना महापालिका प्रशासनाने अधिकाधिक कोरोना चाचण्या करून पॉझिटिव्ह रुग्णांचा वेळीच उपचारासाठी दाखल करण्यावर अधिक भर दिला. परिणामी, वाढती संसर्गाची साखळी कमी करण्यात प्रशासनाला आता यश येत आहे. 

औरंगाबाद शहरात 15 मार्च 2020 रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण निघाला आणि पुढे एप्रिल व मे महिन्यापासून शहरात संसर्गाची साखळी वाढतच गेली. त्यावेळी प्रशासनाने ट्रेस, टेस्ट आणि आयसोलेट हा पॅटर्न वापरत कोरोना संसर्गाची साखळी ब्रेक करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. पुढे जुलै आणि ऑगस्टमध्ये कोरोनाचा मृत्युदर वाढल्याने ज्येष्ठ नागरिकांना वेळीच आरोग्याची सुविधा पुरवण्यासाठी एमएचएमएच अ‍ॅप सुरू केले. या अ‍ॅपद्वारे आजवर अनेक ज्येष्ठ रुग्णांना वेळीच उपचार उपलब्ध झाल्याने त्यांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. यानंतर रुग्णांची संख्या कमी कमी होत जाऊन जानेवारी 2021 पर्यंत शहरात रोज नव्याने आढळणार्‍या कोरोना रुग्णांची संख्या ही 15 ते 20 पर्यंत खाली आली होती. 

आता शहर कोरोनामुक्‍त होणार अशी चिन्हे दिसत असतानाच फेब्रुवारीच्या तिसर्‍या आठवड्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने शहरात शिरकाव केला. मार्च महिन्यातील तिसर्‍या आठवड्यात वाढत्या रुग्णांमुळे बेड्स अपुरे पडू लागले आणि परिस्थिती पुन्हा हाताबाहेर गेली. कोरोनाच्या या दुसर्‍या लाटेचा पॉझिटिव्हिटीचा रेट अधिक असल्याने वाढत्या रुग्णांना सेवा देण्यातच प्रशासनाचा गोंधळ उडाला. दरम्यान, पालिका प्रशासनाने शासन निर्देशान्वये आणि केंद्रीय पथकाच्या सूचनांनुसार पुन्हा अधिकाधिक कोरोना चाचण्या करण्यावर भर दिला. सिटी एन्ट्री पॉइंट, शहरात मोबाइल पथके, विमानतळ व रेल्वेस्टेशनवर नित्याने प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात आहे. पालिकेकडून प्राप्‍त अहवालानुसार, मागील सव्वा महिन्यात 25 मार्च ते 6 मे दरम्यान शहरात अ‍ॅन्टिजेन व आरटीपीसीआर दोन्ही मिळून तब्बल 1 लाख 89 हजार 85 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यापैकी 30,847 पॉझिटिव्ह निघाले असून सुमारे 1.13 लाखांपेक्षा अधिक चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 

पॉझिटिव्हिटी रेट 9.77 टक्क्यांवर
अलीकडे मागील पंधरा दिवसांपासून शहराचा पॉझिटिव्हिटी रेट कमी होऊन तो गुरूवारी दि.6 रोजी 9.77 टक्के एवढा नोंदला गेला. मार्च महिन्यात हा रेट तब्बल 33 टक्क्यांवर पोहचला होता. म्हणजे त्यावेळी शंभर चाचण्यांमागे 33 नागरिक पॉझिटिव्ह निघत होते, त्याजागी आता शंभरामागे सरासरी 10 जण पॉझिटिव्ह निघत आहेत. 

40 दिवसांत 605 रुग्णांचा मृत्यू
25 मार्च ते 6 मे दरम्यान शहरात 605 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या या दुसर्‍या लाटेत गंभीर रूग्णांचे प्रमाण अधिक असल्याने मृतांचा आकडाही वाढला आहे. मात्र मागील काही दिवसांपासून शहरातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही कमी होताना दिसत असून ग्रामीण भागांतील मृतांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे.